नवी दिल्ली : परदेशातून शिक्षण घेऊन परतणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतात पुढील शिक्षण किंवा नोकरी करणे शक्य व्हावे म्हणून परकी विद्यापीठांच्या पदव्यांना मान्यता तसेच समकक्षता प्रदान करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने नवे नियम लागू केले आहेत.
या नियमांमुळे परकी विद्यापीठांच्या पदव्यांना मान्यता देण्यात होणारा विलंब आणि संदिग्धता दूर होण्यात हातभार लागणार असल्याचा विश्वास विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी व्यक्त केला. परकी शैक्षणिक संस्थेची वैधता,शिक्षणाचा कालावधी, पात्रता दर्जा आणि त्यांची भारतातील अभ्यासक्रमांशी तुलना, यासारख्या विशिष्ट निकषांच्या आधारे समकक्षता प्रदान करणारी प्रक्रिया राबविली जाईल.
परदेशी शिक्षण संस्थांच्या पदव्या, पदविका आणि प्रमाणपत्रांना मान्यता देण्याविषयीची प्रक्रिया पारदर्शी करण्याच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. भारतात संबंधित नियामक परिषदांचे नियम आधीपासूनच लागू असलेल्या वैद्यकीय, औषधशास्त्र, सुश्रुषा, विधी, वास्तुकलेसारख्या व्यावसायिक शिक्षणाच्या पदव्यांना हे नियम लागू होणार नाहीत.