मीनाक्षी गुरव : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ६ : कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही मुलांच्या वसतिगृहात अमली पदार्थ, तर मुलींच्या वसतिगृहात दारूच्या बाटल्या सापडणं...अचानकपणे परिसरात गवताला आग लागून ती पसरत जाणं असो वा आवारात एका विकृत व्यक्तीने विद्यार्थिनींसमोर अश्लील कृत्य करण्याची धक्कादायक घटना असो...अशा घटनांमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एकीकडे शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच; दुसरीकडे मात्र सुरक्षा व्यवस्थेतील ढिलाईमुळे विद्यार्थ्यांसह प्राध्यापक, कर्मचारी याची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
विद्यापीठाच्या आवारात गेल्या सहा महिन्यांत घडलेल्या घटनांमुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विद्यापीठाच्या ४११ एकरच्या आवारात सध्या महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवळपास १७४ कर्मचारी तर विद्यापीठाचे १२ सुरक्षा कर्मचारी आहेत. परंतु, विद्यापीठात सुरक्षा कर्मचाऱ्यांची ३८ मंजूर पदे आहेत. त्यातील सध्या केवळ १२ सुरक्षा कर्मचारी कार्यरत आहेत. तर, उर्वरित १७४ सुरक्षा कर्मचारी म्हणून महाराष्ट्र सुरक्षा दलातील कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या हातात विद्यापीठाची सुरक्षा व्यवस्था असली, तरीही मुळातच प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात नसल्याचे वास्तव आहे. परिणामी ढिसाळ व्यवस्थेमुळे विद्यापीठातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
सहा महिन्यांतील घटना
- विद्यापीठाच्या वसतिगृहात गांजा सापडला
- आवारातील गवताला लागलेली आग काही प्रमाणात पसरली
- मुलींच्या वसतिगृहात दारूच्या बाटल्या आढळल्या
- तीन विद्यार्थिनींसमोर बाहेरील एका व्यक्तीने अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार
- वसतिगृहात विद्युत प्रवाहाच्या पॅनलमध्ये झाले शॉर्टसर्किट
सुरक्षा व्यवस्था
व्यवस्था : कर्मचाऱ्यांची संख्या
महाराष्ट्र सुरक्षा बल : १७४
विद्यापीठ प्रशासनाचे सुरक्षा कर्मचारी : १२ (मंजूर पदे ३८)
सुरक्षा सक्षम होण्यासाठी...
- ‘क्विक रिस्पॉन्स टिम’ कार्यान्वित
- सुरक्षा हेल्पलाइनची नव्याने सुरवात
- विशेषतः मुलींसाठी सुरक्षेच्या दृष्टीने चर्चासत्र भरविणे
वसतिगृहात अमली पदार्थ किंवा दारूच्या बाटल्या सापडणे याबाबत कडक कारवाईचा बडगा उगारलाच पाहिजे. परंतु, त्याचबरोबर विद्यापीठाने विद्यार्थ्यांची संवादातूनही मार्ग काढणे आवश्यक आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर असतानाच आता या विद्येच्या माहेरघराला व्यसनाधीनतेचा विळखा पडत आहे. देश-विदेशातील विद्यार्थी विद्यापीठात शिकण्यासाठी येतात. परंतु, विद्यार्थ्यांची सुसंवाद साधण्यासाठी विद्यापीठाने विशेष प्रयत्न केले पाहिजेत.
- डॉ. नीता मोहिते, सदस्य, अधिसभा सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
विद्यापीठात सध्या पुरेसे सुरक्षा कर्मचारी आहेत. मात्र तरीही आवारातील वसतिगृहांच्या सुरक्षिततेसाठी लष्करातील निवृत्त अधिकारी/कर्मचाऱ्यांची नियुक्ती लवकरच करण्यात येणार आहे. याशिवाय विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाकडून पेट्रोलिंग व्हॅन आणि मोटार सायकलद्वारे घालण्यात येणारी गस्त वाढविण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. विद्यापीठात सध्या असणारे १०० टक्के सीसीटीव्ही कार्यरत असून आणखी सीसीटीव्ही नव्याने बसविण्यात येणार आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांशी संवाद वाढविण्याच्या दृष्टीने कार्यशाळा, समुपदेशन उपक्रम सुरू आहेत.
- डॉ. ज्योती भाकरे, प्रभारी कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ