जिल्हा मुख्यालयाच्या वेशीवर पाणीटंचाई
esakal April 06, 2025 11:45 PM

मनोर, ता. ६ (बातमीदार) : मार्चच्या अखेरपासून पालघर जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. सूर्या नदीकिनाऱ्यालगतच्या पालघर तालुक्यातील खडकोली गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या तिन्ही विहिरींनी तळ गाठल्याने पाण्याचा हंडा मिळवण्यासाठी गृहिणींना झोपमोड करावी लागते. पालघर जिल्ह्यासह वसई-विरार आणि मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्राला सूर्या नदीचे पाणी पोहोचत असताना सूर्या नदीपात्रालगतचे ग्रामस्थ पाण्यासाठी जागरण करीत असल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

पालघर जिल्ह्यातील दुर्गम भाग असलेल्या जव्हार, मोखाडा भागात पाणीटंचाई पाचवीला पूजलेली आहे. जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या नदी काठच्या पालघर तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामस्थांना पाण्यासाठी जागरण करण्याची वेळ आली आहे. पालघर तालुक्याच्या ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून कामे सुरू केलेल्या जलजीवन मिशनअंतर्गतच्या पाणीपुरवठा योजना अपूर्ण अवस्थेत आहेत.

पालघर जिल्हा मुख्यालयाच्या पूर्व भागात १६ किमी अंतरावर चहाडे-तांदूळवाडी रस्त्यावरील खडकोली गावाला मार्चच्या अखेरपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जलजीवन योजनेचे काम अपूर्ण असल्यामुळे ग्रामस्थ तीन विहिरींच्या पाण्यावर अवलंबून आहेत. तिन्ही विहिरींनी तळ गाठल्यामुळे पाणी मिळवण्यासाठी पहाटे लवकर उठून अंधारात गृहिणींना विहिरीवर धाव घ्यावी लागते. पाण्यासाठी बराच वेळ जात असल्यामुळे अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. विहिरीतील पाणी मिळवण्यासाठी झोपमोड होत असल्यामुळे गृहिणींची गैरसोय होत आहे. अपूर्ण अवस्थेतील चहाडे-वसरे-खडकोली जलजीवन योजनेचे काम पूर्ण करून खडकोली गावाला पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

काम अंतिम टप्प्यात
जलजीवन मिशनअंतर्गतची चहाडे-वसरे-खडकोली पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात आहे. योजना चाचणीच्या टप्प्यात असून, घरोघरी नळजोडणी झालेली असून, चाचणीसाठी सोडले जाणारे पाणी १० ते १५ मिनिटे पोहोचते. खोदकामात जुन्या जलवाहिन्या तुटल्यामुळे ग्रामस्थांना पाणी उपलब्ध होत नाही.

मुदत संपल्यानंतरही काम अपूर्ण
खडकोली गावात जलजीवन योजनेअंतर्गत घरोघरी नळजोडणी दिली जाणार आहे. ४६५ घरांना नळजोडणी दिली जाणार असून, यासाठी २८ लाख ५६ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. योजनेचे काम पूर्ण करण्याची मुदत संपली असून, नळजोडणीचे काम झालेले नाही.

होळीनंतर तिन्ही विहिरी आटल्या आहेत. पाणी भरण्यासाठी रात्री जागावे लागते. पाणी मिळाले नाही, तर पहाटे लवकर उठून विहिरीवर जावे लागते. मोठी गैरसोय होत असल्यामुळे पाणीपुरवठा योजना पूर्ण करून पाणी उपलब्ध करून दिली पाहिजे.
- वासंती मोरे, गृहिणी, खडकोली

आमच्या गावालगतच्या सूर्या नदीचे पाणी मुंबईच्या वेशीवर मिरा-भाईंदरपर्यंत पोहोचले, परंतु आम्ही तहानलेले आहोत. टँकरमधून पाणी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. तसेच जलजीवन योजनेच्या कामाला उशीर करणाऱ्या ठेकेदाराविरोधात कारवाई करावी.
- सुनंदा वरठा, गृहिणी, खडकोली

चहाडे-वसरे-खडकोली पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून, चाचणी घेतली जात आहे. चहाडे गावाला पाणीपुरवठा होत आहे. खडकोली गावातील अपूर्ण कामे पूर्ण करून योजनेचे पाणी गावाला उपलब्ध करून देण्याचे निर्देश ठेकेदाराला दिले जातील.
- बापूसाहेब शिंदे, उपविभागीय अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती, पालघर

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.