इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स संघात रविवारी (६ एप्रिल) सामना सुरू आहे. या सामन्यात गुजरातने सामन्यात वर्चस्व ठेवलं आहे. पण तरी त्यांना एक मोठा धक्का या सामन्यात बसला. त्यांचा एक महत्त्वाचा खेळाडू दुखापतग्रस्त झाला असून त्याला मैदानातूनच बाहेर जावं लागलं आहे.
या सामन्यात प्रथम गोलंदाजी करणाऱ्या गुजरातला मोहम्मद सिराजने दमदार सुरुवात करून दिली होती. त्याने ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या सनरायझर्स हैदराबादच्या सलामीवीरांच्या विकेट्स घेतल्या होत्या.
पण या सामन्यात पॉवरप्ले सुरू असताना सध्याचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक असलेल्या ग्लेन फिलिप्स सब्स्टिट्युट म्हणून क्षेत्ररक्षण करायला आला होता.
६ व्या षटकादरम्याने प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर इशान किशनने शॉट खेळला. पण तो शॉट फिलिप्सने सूर मारत आडवला. पण यादरम्यान त्याच्या मांडीजवळ वेदना झाल्या, ज्यामुळे तो थेट खाली झोपला. त्यामुळे फिजिओ लगेचच मैदानात आले. त्यांनी त्याला तपासल्यानंतर लक्षात आले की त्याच्या वेदना अधिक आहेत. त्याला चालताही येत नव्हते, त्यामुळे त्याला आधार देत मैदानातून बाहेर नेण्यात आले.
खरंतर फिलिप्सला २ कोटी रुपयांना गुजरातने खरेदी केले असले, तरी अद्याप त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली नव्हती. पण त्याला या सामन्यात इम्पॅक्ट सबस्टिट्युट म्हणून खेळवले जाण्याची दाट शक्यता होती. परंतु, आता त्याला दुखापत झाल्याने त्याच्या उपलब्धतेवरही प्रश्नचिन्ह आहे.
आधीच कागिसो रबाडा वैयक्तिक कारणामुळे घरी परतला आहे. अशात फिलिप्सची दुखापत गुजरातसाठी चिंतेचे कारण ठरू शकते. दरम्यान, त्याची दुखापत किती गंभीर आहे, हे अद्याप समजलेले नाही. पण गुजरातला तो लवकर बरा व्हावा, अशी अपेक्षा असेल.
दरम्यान, या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला गुजरातने २० षटकात ९ बाद १५२ धावांवरच रोखलं. हैदराबादकडून नितीश रेड्डीने ३१ धावांची खेळी केली, हेन्रिक क्लासेनने २७ धावा केल्या आणि कर्णधार पॅट कमिन्सने २२ धावांची खेळी केली. बाकी कोणाला खास काही करता आले नाही. गुजरातकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.