गिरीश निकम, साम टीव्ही
पालघर : काय पोपटासारखा बोलतोस असं आपण गमतीनं म्हणतो. घरात पाळलेले पोपट माणसांशी संवाद साधतात हे नवीन नाही. पण चक्क कावळाही माणसांसारखा बोलतोय म्हटल्यावर आर्श्चय वाटणारच. चला आपण या आगळ्यावेगळ्या कावळ्याची भेट घेऊया. हे आहे गारगाव. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गाव. इथल्या एका फार्म हाऊसमध्ये राहणारे मंगळ्या मुकणेंचं कुटुंब सध्या चर्चेत आलंय. कोणाला फार माहितीही नसलेला या परीसराकडे आता अनेकांची पाऊलं वळतायेत. त्याला निमित्त ठरलाय हा कावळा. सर्वसामान्य कावळांसारखाच दिसणारा हा कावळा चक्क माणसांसारखा बोलत असल्यानं जास्त भाव खाऊन जातोय.
तीन वर्षांपूर्वी मुकणेंच्या मुलाला कावळ्याचे पिल्लू वादळी वाऱ्यात जखमी अवस्थेत सापडले होते. घरातील सर्व सदस्यांनी या पिल्लाला मायेने वाढवले आणि त्याचे नाव 'काल्या' असे ठेवले. अडीच महिन्यांपासूनच हा काल्या अचानक लहर आली की, मुलांच्या बोलण्याची नक्कल करतो, असे लक्षात आले. काल्याच्या या हुशारीचा गावातील एकानं व्हिडीओ काढला. आणि बघता बघता काल्या व्हायरल झाला. आणि कधीही न मिळणारे प्रेम, कौतुक कावळ्याचाही वाट्याला आलंय.
काका, काल्या, काय, बाबू, सरगम, हो, नाही, आई असे अनेक शब्द तो बोलतो. खोकला झाल्यासारखा तो खोकूनदेखील दाखवतो. मायेने जीव लावला की, पक्षीदेखील माणसाशी एकरूप होतात. याचे हे जिवंत उदाहरण आहे. तीन वर्षांपासून तो इथेच खातो. बाजूच्या झाडावर रात्री राहतो. मात्र आपल्या बांधवांसोबत त्यांच्या जगात जाण्याचे नाव घेत नाही. कारण काल्याला मुकणे कुटुंबाच्या मायेची उब मिळाली आहे. आता पक्षीतज्ञांनीही काल्याच्या वैशिष्ट्याचा अभ्यास करुन या प्रकारावर आणखी प्रकाश टाकण्याची गरज आहे.