इंडियन प्रीमियर लीग २०२५ मध्ये अनेक युवा खेळाडूंनी आपली छाप पाडली आहे. यामध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून खेळणाऱ्या २५ वर्षीय मिस्ट्री स्पिनर दिग्वेश राठीचाही समावेश आहे. तो त्याच्या गोलंदाजीसोबतच त्याच्या सेलिब्रेशनसाठीही चर्चेत आहे.
त्याने नुकतीच ४ एप्रिलला मुंबई इंडियन्सविरुद्ध लखनौ सुपर जायंट्सला १२ धावांनी विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्याने या सामन्यात २१ धावाच देत एक विकेट घेतली होती. त्यामुळे त्याला सामनावीर पुरस्कारही मिळाला होता.
त्याने आत्तापर्यंत आयपीएल २०२५ मध्ये ४ सामन्यांत ६ विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान, मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यानंतर दिग्वेशने सांगितले होते की तो वेस्ट इंडिजचा दिग्गज सुनील नरेनला आदर्श मानतो. त्याला पाहूनच त्याला गोलंदाजीची प्रेरणा मिळाली.
तसेच तो त्याच्याप्रमाणे गोलंदाजी करण्याचाही प्रयत्न करतो. आता त्याचे त्याचा आदर्श असलेल्या सुनील नरेनशी भेटही झाली आहे.
लखनौला ८ एप्रिलला कोलकातामध्ये सामना खेळायचा आहे. यासाठी लखनौ संघ कोलकाताला पोहचला असून सरावालाही सुरुवात केली आहे. यावेळीचा एक व्हिडिओ कोलकाता नाईट रायडर्सने शेअर केला आहे.
ज्यात दिसते की लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार कोलकाता नाईट रायडर्सचा सलामीवीर सुनील नरेनला घेऊन येतो आणि त्याची दिग्वेश राठीशी भेट घडवून आणतो.
रिषभ पंत सुनील नरेनला आधी दिग्वेशची ओळख करून देतो आणि मग दिग्वेशला विश्वास वाटावा म्हणून त्याला असेही सांगतो की 'हो, हाच सुनील नरेन आहे.' त्यानंतर तिथेच बसलेला निकोलस पूरन दिग्वेश राठीला सांगतो की आता त्याला सांग की तू रोज त्याच्याबद्दल बोलतोस. हे ऐकून नरेनही हसतो.
त्यानंतर पूरन दिग्वेशला प्रश्न विचारतो की 'सुनील नरेन तर सेलिब्रेट करत नाही, मग तू ते सेलिब्रेशन का करतो?' त्यावर दिग्वेश उत्तर देतो की 'मी दिल्लीचा आहे ना'. त्याचं उत्तर ऐकून सर्वचजण हसायला लागतात. यानंतर पंत म्हणतो की दिग्वेश तिकीट कलेक्टर आहे आणि नरेन विकेट कलेक्टर आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
दिग्वेश विकेट घेतल्यानंतर हातावर काहीतरी लिहिल्यासारखी कृती करत सेलिब्रेशन करतो. त्याची हे सेलिब्रेशनची स्टाईल गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यानतंर त्याला या सेलिब्रेशनमुळे बीसीसीआयने २५ टक्के दंडही ठोठावला होता. त्यावेळी त्याने प्रियांश आर्यविरुद्ध आक्रमक सेलिब्रेशन केले होते.
त्यानंतर त्याने मुंबई इंडियन्स विरुद्धही त्याने नमन धीरला बाद केल्यानंतरही तसेच सेलिब्रेशन केले. ज्यामुळे त्याला ५० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे दोन सामन्यात त्याला जवळपास साडेपाच लाख रुपयांचा एकूण दंड बसला आहे.