इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स संघाची सुरुवात फारशी चांगली झालेली नाही. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला पहिल्या चारपैकी तीन सामन्यात पराभवाचा धक्का बसला आहे. त्यातच त्यांना खेळाडूंच्या दुखापतींचीही चिंता आहे.
रोहित शर्मा चौथ्या सामन्यातून दुखापतीमुळे बाहेर होता. पहिल्या चारही सामन्यात जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे उपलब्ध नव्हता. आता अशातच चौथा पाचवा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियमवर खेळायचा आहे.
या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह संघात परतला आहे. गेली ३ महिने क्रिकेटपासून पाठीच्या दुखापतीमळे दूर होता. पण आता तो पूर्ण फिट असून खेळण्यासाठी सज्ज आहे.
बुमराह शनिवारी (५ एप्रिल) मुंबई संघात दाखल झाला आहे. त्याने लगेचच रविवारी संघासोबत सरावही केला असून त्याच्या नेटमधील गोलंदाजीचे व्हिडिओही मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
दरम्यान, एका खास व्हिडिओ मुंबईने शेअर केला आहे, ज्यामध्ये दिसते की मुंबई इंडियन्सचे बरेच खेळाडू गोलाकार उभे आहेत. तिथे जसप्रीत बुमराह देखील आहे आणि मुंबई इंडियन्सचा फलंदाजी प्रशिक्षक कायरन पोलार्ड देखील आहे.
यावेळी पोलार्ड बुमराहचे संघात स्वागत करताना दिसत आहे. त्याने त्याला म्हटले की 'वेलकम मुफासा' आणि त्याने थेट त्याला खांद्यावर उचलून घेतलं. त्यावेळी बुमराहलाही ओशाळल्यासारखं झालं. त्यानंतर त्याने बुमराहला खाली उतरवले, त्यावेळी हसत परत आपल्या जागेवर जाताना बुमराहचा पाय जोरात मागे उभे असलेल्या अर्जुन तेंडुलकरच्या पायावर पडला.
त्यामुळे अर्जुनला वेदना झाल्याचं त्याच्या चेहऱ्यावरून दिसून आले. पण एकूणच बुमराहच्या येण्याने संपूर्ण मुंबई इंडियन्सच्या संघात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
बुमराह जरी मुंबई इंडियन्स संघात परतला असला, तरी तो बंगळुरूविरुद्ध खेळणार की नाही, असा सर्वांना प्रश्न होता. पण मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने तो सोमवारी होणाऱ्या सामन्यासाठी उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे.
त्यामुळे बुमराह वानखेडे स्टेडियमवर बंगळुरूविरुद्ध खेळताना दिसू शकतो. आता त्याला कोणाच्या जागेवर संधी दिली जाणार, हे पाहावे लागणार आहे.