आळंदी - आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा यंदा १९ जून रोजी आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. सोहळा पाच जुलै रोजी पंढरपुरात पोहोचणार आहे.
दरम्यान, यंदा प्रस्थानला गुरुवार आल्याने दर गुरुवारी होणारी पालखीची मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर म्हणजे रात्री आठ वाजता मुख्य प्रस्थान सोहळा सुरू होणार आहे, अशी माहिती प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ यांनी दिली. दरम्यान, पालखी मार्गावर लोणंद येथे दोन दिवसांच्या मुक्कामांबाबतचा निर्णय प्रलंबित असल्याने अंतिम वेळापत्रकासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
आळंदी देवस्थानचे विश्वस्त आणि दिंडी समाज संघटना यांची बैठक सोमवारी (ता. ७) पंढरपुरात पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यतेखाली झाली.
यावेळी पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, रामभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, विठ्ठल महाराज वासकर, नामदेव महाराज वासकर, माउली महाराज जळगावकर, भाऊसाहेब महाराज गोसावी, मारुती महाराज कोकाटे, भाऊ महाराज फुरसुंगीकर आणि दिंडीकरी-फडकरी यांची उपस्थिती होती.
योगी निरंजननाथ म्हणाले, ‘संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळ्याचे १९ जूनला आळंदीच्या देऊळवाड्यातून प्रस्थान होणार आहे. प्रस्थानाच्या दिवशी गुरुवार आल्याने दर गुरुवारची पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखीचे रात्री आठनंतर प्रस्थान सोहळा सुरू होईल.
पहिला मुक्काम आळंदीतच नवीन दर्शन मंडपात होईल. बैठकीतील चर्चेनुसार लोणंदमध्ये यंदा एक मुक्काम होता. मात्र, दरवर्षीप्रमाणे दोन दिवसांचा मुक्काम असावा, अशी दिडीप्रमुखांची मागणी होती.