लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता खात्यात कधी जमा होणार? समोर आली मोठी अपडेट
Marathi April 08, 2025 12:25 PM

लाडकी बहिन योजना: लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय्य तृतीयेच्या (Akshaya Tritiya 2025) मुहुर्तावर मिळणार आहे. म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता 30 एप्रिल रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. एप्रिल महिन्याच्या हप्त्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढणार की घटणार? याकडे आता लक्ष लागले आहे. मागील हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या वाढली होती.

महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) जुलै 2024 पासून लागू केली आहे. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर महायुतीनं आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. जानेवारीपासून लाडकी बहीण योजनेत ज्या महिला पात्र ठरल्या होत्या, त्यांची पडताळणी करण्यात येत आहे. त्यासाठी राज्य सरकारने निकष ही लावले आहे. या योजनेचा गैरफायदा अनेक महिलांनी घेतल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या होत्या. त्यानंतर आता पडताळणी केली जात आहे.

याबाबत महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले होते की, ही योजना 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी लागू आहे, त्यामुळे 65 वर्षे पूर्ण करणाऱ्या महिलांचा लाभ दर महिन्याला बंद होतो. यामुळे लाभार्थ्यांची संख्या नियमितपणे बदलत असते. सध्या सुमारे 1.20 लाख महिलांनी वयोमर्यादा ओलांडल्यामुळे त्या योजनेतून बाद झाल्या आहेत. त्याचप्रमाणे, विवाहानंतर इतर राज्यांत स्थायिक झालेल्या महिलांचाही योजनेंतर्गत विचार केला जात नाही. राज्यातील जवळपास अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळत असून, महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आला आहे. या योजनेसाठी अर्ज केलेल्या एकूण महिलांपैकी जवळपास 11 लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत.

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर मिळणार लाडकी बहीण योजनेचा हप्ता

आता एप्रिल महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर मिळणार आहे.  महिन्याच्या शेवटी लाडकी बहीण योजनेचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. विशेष म्हणजे यंदा लाभार्थ्यांची संख्या घटणार की वाढणार? असा सवाल उपस्थित होत आहे. कारण मागील हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या काही प्रमाणात वाढली होती. यंदा किती लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? अजित पवारांनी दिली महत्वाची माहिती

Temperature Heat Wave: विदर्भात उष्णतेची भयंकर लाट येणार, हवामान खात्याचा धोक्याचा इशारा, ‘या’ जिल्ह्यांनाही हायअलर्ट

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.