पुणे - जिल्ह्यात सुरू असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती प्रक्रियेतून तीन प्रकल्पांमधील प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आतापर्यंत २० अंगणवाडी सेविका आणि ३० मदतनीस या बालकांचे शिक्षण, पोषणाची काळजी घेण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. इतर प्रकल्पांतील भरती प्रक्रिया आठ दिवसांमध्ये पूर्ण होणार असल्याचा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.
जिल्ह्यामध्ये चार हजार ३९५ अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची पदे आहेत. त्यापैकी या भरतीमध्ये २०२ अंगणवाडी सेविका आणि ४९९ मदतनीस पदांसाठी भरती करण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये अंगणवाडीसाठीचे २२ प्रकल्प आहेत. त्यापैकी तीन प्रकल्पांची भरती पूर्ण होऊन त्या सेविका आणि मदतनीस रुजू झाल्या आहेत.
अंगणवाडी सेविका, मदतनीस भरतीसाठी किमान बारावी उत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. यांसह इतरही निकष तपासले जात आहेत. याच बरोबर विधवा, अनाथ, प्रवर्ग आणि अनुभवानुसार गुणांकन दिले जात आहे.
अर्ज केल्यानंतर अर्जाची छाननी करून गुणवत्ता यादी लावण्यात येणार आहे. या यादीनंतर आक्षेप मागविण्यात येतात. यावर कोणाचा आक्षेप नसल्यास यादी अंतिम करून गुणांकनानुसार त्यांना पदाच्या नियुक्तीचा आदेश पंचायत समिती स्तरावरून देण्यात येत आहेत.
बावीस प्रकल्पांपैकी तीन प्रकल्पांची भरती झाली आहे. इतर प्रकल्पांची भरती प्रक्रिया ही १५ एप्रिलपर्यंत पूर्ण करून सर्व सेविका आणि मदतनीस मे महिन्यात रुजू होतील. त्यानंतर एकत्रितपणे सर्वांचे प्रशिक्षण होईल. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या पुढील भरतीसाठी जिल्हा परिषद स्तरावर ऑनलाइन प्रक्रिया राबविली जाणार आहे.
- जामसिंग गिरासे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद