इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेच्या २० व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सविरुद्ध १२ धावांनी विजय मिळवला. हा बंगळुरूचा वानखेडे स्टेडियमवर १० वर्षांनी मिळवलेला पहिला विजय ठरला. त्यांनी २०१५ नंतर पहिल्यांचा या स्टेडियमवर विजय मिळवला.
गेल्यावर्षी याच मैदानात मुंबईने बंगळुरूचा दारुण पराभव केला होता, ज्याचा सोमवारी बंगळुरूने वचपा काढला. यंदाच्या हंगामातील हा चौथ्या सामन्यातील तिसरा विजय ठरला, तर मुंबईचा पाच सामन्यातील चौथा पराभव ठरला आहे. तसेच घरच्या मैदानातील यंदाच्या हंगामातील पहिला पराभव आहे.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बंगळुरूने विजयासाठी २२२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईला २० षटकात ९ बाद २०९ धावाच करता आल्या. कृणाल पांड्यासह बंगळुरूच्या सर्वच गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली.
मुंबईकडून सलामीला फलंदाजीसाठी रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन उतरले होते. रोहितने आक्रमक सुरुवातही केली होती. पण त्याला फार काळ यश दयालने टिकू दिले नाही. त्याने रोहितला दुसऱ्याच षटकाच्या चोथ्या चेंडूवर त्रिफळाचीत केले. रोहितने ९ चेंडूत १७ धावा केल्या.
चौथ्या षटकात रिकल्टनला जोश हेजलवूडने १७ धावांवरच पायचीत पकडले. पण नंतर विल जॅक्स आणि सूर्यकुमार यादव यांनी डाव सावरला होता. त्यांच्यात ४१ धावांची भागीदारीही झाली. पण ही भागीदारी विल जॅक्सनला २२ धावांवर कृणाल पांड्याने विराट कोहलीच्या हातून झेलबाद केले.
दरम्यान, सूर्यकुमारचा झेलही बंगळुरूच्या क्षेत्ररक्षकांमध्ये झालेल्या गोंधळामुळे सुटला. पण त्याला मिळालेले जीवदान फार महागात पडले नाही. कारण सूर्यकुमारला यश दयालने लियाम लिव्हिंगस्टोनच्या हातून झेलबाद केले. सूर्यकुमारने २६ चेंडूत २८ धावांची खेळी केली. त्यानंतर मात्र, हार्दिक पांड्या फलंदाजीला आल्यानंतर त्याने आणि तिलकने गिअर बदलला आणि फटकेबाजी सुरू केली.
१४ व्या षटकात हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांनी २२ धावा वसूल केल्या. यात हार्दिकने दोन षटकार आणि दोन चौकार मारले. त्यानंतरही दोघांनीही काही मोठे फटके खेळत मुंबईच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या.
तिलकने अर्धशतकही केले. पण मोक्याच्या क्षणी तिलक वर्माला १८ व्या षटकात भुवनेश्वर कुमारने फिल सॉल्टच्या हातून झेलबाद केले. तिलकने २९ चेंडूत ५६ धावांची खेळी केली. यात ४ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे.
त्याच्यानंतर १९ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिक पांड्याचा अडथळाही जोश हेजलवूडने दूर केला. हार्दिकने १५ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह ४२ धावा केल्या. त्याचा झेल लियाम लिव्हिंगस्टोनने घेतला.
शेवटच्या षटकात मुंबईला १९ धावांची गरज होती. पण कृणाल पांड्याने अप्रतिम गोलंदाजी करताना या षटकात मिचेलस सँटेनर (८), दीपक चाहर (०) आणि नमन धीर (११) यांना पराभवाचा धक्का दिला.
बंगळुरूकडून गोलंदाजी करताना कृणाल पांड्याने ४ विकेट्स घेतल्या, तर जोश हेजलवूड आणि यश दयाल यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. भूवनेश्वर कुमारने १ विकेट घेतली.
तत्पुर्वी, मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. बंगळुरुकडून विराट कोहली, कर्णधार रजत पाटिदार, जितेश शर्मा यांनी आक्रमक खेळ केला.
विराटने ४२ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह ६७ धावांची खेळी केली, तर रजतने ३२ चेंडूत ६४ धावांची खेळी केली, ज्यात ५ चौकार आणि ४ षटकार मारले. जितेश शर्माने २ चौाकर आणि ४ षटकारांसह १९ चेंडूत नाबाद ४० धावा केल्या. देवदत्त पडिक्कलनेही २२ चेंडूत ३७ धावांची चांगली खेळी केली. यामुळे बंगळुरूने २० षटकात ५ बाद २२१ धावा केल्या होत्या.
मुंबईकडून गोलंदाजी करताना ट्रेंट बोल्ट आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तसेच विघ्नेश पुथूरने १ विकेट घेतली.