गणेश तावडे यांचा
कणकवलीत सत्कार
कणकवली ः शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक गणेश तावडे यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. संघाचे अध्यक्ष प्रकाश सावंत, उपाध्यक्ष सुरेश ढवळ व सर्व संचालकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. शेतकरी संघाच्या कणकवली येथील प्रधान कार्यालयात आयोजित सत्कार कार्यक्रमात गणेश तावडे यांच्या संघातील सेवेच्या वाटचालीचा आढावा घेतला. मालवण तालुक्यातील असरोंडी गावचे मूळचे रहिवासी असलेले गणेश तावडे हे नोकरीनिमित्त कणकवली शहरात स्थायिक झाले. आपल्या वाटचालीमध्ये पत्नी श्रद्धा तावडे यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. सत्कार सोहळ्यास संचालक विनिता बुचडे, संजय शिरसाठ, सदानंद हळदिवे, प्रशांत सावंत, हिशेबनीस संदीप तोरस्कर व कर्मचारी उपस्थित होते. माजी व्यवस्थापक प्रकाश घाडीगावकर, नवनियुक्त व्यवस्थापक डी. आर. परब, सहायक व्यवस्थापक राजेंद्र सावंत, कर्मचारी कविता राणे, विश्वनाथ गवंडळकर यांनी विचार मांडताना तावडे यांच्या कार्याचा गौरव केला.
---
कोळंबला शनिवारी
पुण्यतिथी उत्सव
मालवण ः कोळंब येथील श्री संत नाटेकर आजींचा ३० वा तपपूर्ती सोहळा पुण्यतिथी उत्सव शनिवारी (ता. १२) हनुमान जयंती दिनी साजरा होत आहे. सकाळी ८.३० वाजता दुग्धाभिषेक व लघुरुद्र, १०.३० वाजता श्री विष्णुसहस्त्रनाम व गुरुगीता वाचन, दुपारी १२ वाजता महाआरती, १ पासून महाप्रसाद, १ ते ३ पर्यंत श्री देव जैन रामेश्वर प्रासादिक दिंडी भजन मंडळ चुनवरे यांचे भजन, ३ ते ४ पर्यंत श्री नामदेव महाराज भक्त मंडळाचे वारकरी चक्रीभजन, ४ वाजता कलावती आई मंडळाचे भजन, सायंकाळी ६ वाजता स्थानिक भजने, रात्री ८ वाजता श्री देवी घुमडाई प्रासादिक भजन मंडळाचे भजन, ९ वाजता कोळंब, न्हिवे, कांदळगाव येथील मंडळांची भजने होणार आहेत. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन भालचंद्र शांताराम प्रभुगावकर यांनी केले आहे.
......................
कारिवडे गवळदेव
मंदिराचा वर्धापन दिन आज
ओटवणे ः कारिवडे गवळीवाडी येथील गवळदेव मंदिराच्या १३ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त उद्या (ता. ८) विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी ८ वाजता अभिषेक, पूजा आदी धार्मिक कार्यक्रम, १० वाजता ‘श्रीं’ची महापूजा, आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ५.३० वाजता श्री श्री १०८ महंत मठाधीश सद्गुरू गावडेकाका महाराज यांचे आध्यात्मिक मार्गदर्शन, सायंकाळी ६.३० वाजता ‘कोकणी रानमाणूस’ प्रसाद गावडे यांचे कोकण संस्कृतीवर व्याख्यान, सायंकाळी ७ वाजता मान्यवरांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, रात्री ८ वाजता महाप्रसाद, त्यानंतर लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ (नेरुर) यांचा ‘भूतनाथ’ नाट्यप्रयोग होईल. लाभ घ्यावा, असे आवाहन गवळदेव देवस्थान ट्रस्टने केले आहे.
....................
दोडामार्गात सरपंचपद
आरक्षण सोडत आज
दोडामार्ग ः ‘‘दोडामार्ग तहसील कार्यालयात उद्या (ता. ८) सकाळी ११ वाजता तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींच्या प्रवर्गनिहाय सरपंचपदाचे आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे,’’ अशी माहिती प्रभारी तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांनी दिली. सरपंचपदाच्या प्रवर्गनिहाय आरक्षणाची संख्या पुढीलप्रमाणे असेल. यात अनुसूचित जमातीसाठी आरक्षित पदे प्रवर्ग १, महिला १, अनुसूचित जातीसाठी आरक्षित पदे प्रवर्ग ०, महिला ० नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित पदे प्रवर्ग ५ महिला ५ व खुला प्रवर्गामध्ये प्रवर्ग १२, महिला १२ अशाप्रकारे सरपंचपदाचे आरक्षण सोडत पद्धतीने (चिठ्ठ्या टाकून) निश्चित केले जाणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन प्रभारी तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांनी केले आहे.
.....................
माळगावात ११ पासून
हनुमान जयंती सोहळा
मसुरे ः माळगाव-लाटकोंडवाडी गडकरीवाडी (ता. मालवण) येथील हनुमान मंदिरात ११ व १२ एप्रिलला हनुमान जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (ता. ११) रात्री १० वाजता (कै.) सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. शनिवारी (१२) पहाटे मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा, आरती व अन्य धार्मिक विधी होणार आहेत. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन हनुमान प्रासादिक भजन मंडळ, माळगाव (गडकरीवाडी) यांनी केले आहे.