सद्गुरू
भक्ती ही एक विचित्र गोष्ट आहे. भक्ती म्हणजे जी स्वरहित आहे. ते प्रेमप्रकरण नाही. प्रेम स्वतःच एक विचित्र गोष्ट आहे; पण त्याला समंजसपणाचे अंश असतात; तुम्ही तरीही त्यातून सावरू शकता. भक्तीमध्ये, समंजसपणाचा कोणताही अंश नाही. भक्ती सावरण्याची संधी देत नाही.
जेव्हा मी भक्ती म्हणतो, तेव्हा मी विश्वास प्रणालीबद्दल बोलत नाही. विश्वास हा नैतिकतेसारखाच आहे. जे लोक कोणत्यातरी मूर्ख गोष्टींवर विश्वास ठेवतात, ते स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतात. ज्या क्षणी तुम्ही एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवता, तुम्ही जास्त चांगले बनत नाही; फक्त तुमच्या मूर्खपणाचा आत्मविश्वास वाढतो. आत्मविश्वास आणि मूर्खपणा ही धोकादायक जोडी आहे. ते कधीही एकत्र नसले पाहिजेत; पण बऱ्याचदा ते एकत्र आढळतात, कारण ते त्यांचे स्वरूप आहे. तुम्ही जितके बुद्धिमान असता, तितके अनेक बाबतीत संकोची बनता, कारण तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या सर्व पैलूंकडे पाहायला सुरवात केली, तर तुम्हाला हे स्पष्टपणे समजते, की तुम्हाला जे माहीत आहे ते खूपच नगण्य आहे; आत्मविश्वासाने वावरण्यासाठी काही पर्यायच नाही. विश्वास प्रणाली ही समस्या दूर करते. ती तुम्हाला प्रचंड आत्मविश्वास देते; पण ती तुमचा मूर्खपणा दूर करत नाही.
मी विश्वासाविषयी बोलत नाही, मी भरवसा ठेवण्याबद्दल बोलत आहे. मग प्रश्न उद्भवतो, ‘मी भरवसा कसा ठेवू?’ तुम्ही आरामात बसलेले आहात ही वास्तविकता, म्हणजेच भरवसा आहे. कारण तुम्हाला माहिती आहे, की अशा घटना घडल्या आहेत, जिथे पृथ्वी दुभंगली आणि लोकांना गिळून टाकले. अशा घटना घडलेल्या आहेत, जिथे आकाशाचे तुकडे लोकांवर पडले आणि ते चिरडून मेले. ही गोल पृथ्वी फिरत आहे आणि प्रचंड वेगाने प्रवास करत आहे आणि संपूर्ण सौरमंडळ आणि आकाशगंगा आपल्याला माहीत नसलेल्या वेगाने प्रवास करत आहेत. समजा पृथ्वीमातेने अचानक विरुद्ध दिशेने फिरायचा निर्णय घेतला, तर कदाचित तुम्ही सध्या जिथे बसला आहात तिथून उडून जाल - तुम्हाला माहीत नाही.
तर तुम्हाला बसण्यासाठी, हसण्यासाठी, ऐकण्यासाठी आणि कोणाशी बोलण्यासाठी, भरवशाची गरज आहे-प्रचंड भरवसा, नाही का? पण तुम्ही हे अजाणपणे आणि प्रेमाशिवाय करत आहात. फक्त या भरवशाला जाणीवपूर्वक आणि प्रेमाने करायला शिका. हीच भक्ती आहे. एकदा तुम्ही इथे बसायला शिकलात, जाणीवपूर्वक आणि प्रेमाने, अस्तित्व जसे आहे तसा त्यावर भरवसा ठेवून, तीच भक्ती आहे. भक्ती ही विश्वास प्रणाली नाही. भक्ती ही अस्तित्वात असण्याची सर्वांत गोड पद्धत आहे.