मुंबई : दहावी, बारावीच्या परीक्षांचे निकाल लागतील त्या दिवशी संकेतस्थळ क्रॅश व्हायला नको याची खबरदारी घेण्याचे निर्देश माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे. या वर्षी मे महिन्याच्या मध्यावर दहावी -बारावीचे निकाल जाहीर होणार आहेत. हे लक्षात घेत शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळाची क्षमता वाढविण्याचे आदेश त्यांनी दिले.
निकालाच्या दिवशी लाखो विद्यार्थी ऑनलाइन निकाल पाहत असतात. तेव्हा संकेतस्थळ क्रॅश होणे टाळण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभाग व शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांची सोमवारी संयुक्त बैठक झाली. मंडळाच्या संकेतस्थळाची सायबर सुरक्षितता कशी तयार करता येईल याबाबत येत्या सात दिवसात अहवाल सादर करण्यास शेलार यांनी सांगितले आहे.
दहावी, बारावी निकालाच्या तारखेला विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी संकेतस्थळाची क्षमता किती याचा आढावा घेण्यासाठी ही संयुक्त बैठक त्यांनी घेतली. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक अनिल भंडारी आणि सचिव सुदाम आंधळे या बैठकीला उपस्थित होते.
शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळाची क्षमता व त्यामध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी याबाबत माहिती मंत्र्यांनी जाणून घेतली. शेलार म्हणाले, ‘‘दहावी व बारावीचे निकाल जाहीर झाल्यावर महाराष्ट्रातील लाखो मुले एकाच वेळेस निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळावर लॉग-इन करून पाहतात. अशा वेळेस संबंधित संकेतस्थळावर ताण येऊन ते ‘क्रॅश’ होऊन मुलांची गैरसोय होते. या संकेतस्थळ प्रणालीची क्षमता सतत तपासणे आवश्यक आहे. त्यानंतर त्याची क्षमता वाढविण्याचा निर्णय घेण्याचेही ठरले आहे. त्यासाठी सध्याच्या संकेतस्थळाच्या क्षमतेचा अहवाल तयार करा. या संकेतस्थळाची क्षमता वाढवण्यासाठी काय करता येईल याबाबत अहवाल तयार करा.