Punjab Kings vs Chennai Super Kings Marathi Update : प्रियांश आर्याने त्याच्या फटकेबाजीने पंजाब किंग्सच्या चाहत्यांना खूश केले. पंजाबची मालकीण प्रीति झिंटाही त्याच्यासाठी जागेवर उभं राहून टाळ्या वाजवताना दिसली. श्रेयस अय्यर, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस यांना आज शांत ठेवण्यात चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांना यश आले. आर अश्विन व खलील अहमद यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेताना पंजाबला ८५ धावांत ५ धक्के दिले होते. पण, प्रियांश मैदानावर उभा राहिला आणि त्याने १९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.
श्रेयस अय्यरचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय सलामीवीर प्रियांश आर्याने सार्थ ठरवला. त्याने १९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि आयपीएलमधील ही संयुक्तपणे दुसरी वेगवान फिफ्टी ठरली. प्रियांशने पहिलाच चेंडू सीमापार पाठवला, खलील अहमदने दुसऱ्या चेंडूवर चांगले पुनरागमन केले. मात्र, तो झेल घेऊ शकला नाही आणि प्रियांशला जीवदान मिळाले.
प्रियांश हा भारतीय महान फलंदाज विराट कोहलीच्या विक्रमाच्या यादीत सामील झाला. डावातील पहिल्याच चेंडूवर षटकार खेचणारा प्रियांश हा चौथा फलंदाज ठरला. यापूर्वी, नमन ओझा ( विरुद्ध केकेआर, डर्बन, २००९), विराट कोहली ( विरुद्ध आरआर, बेंगळुरू, २०१९), फिल सॉल्ट ( विरुद्ध एमआय, मुंबई, २०२४) यांनी हा पराक्रम केला आहे.
मुकेश चौधरीने त्याच्या पहिल्या षटकात प्रभसिमरन सिंगला ( ०) त्रिफळाचीत केले. कर्णधार श्रेयसने षटकाराने आशा पल्लवीत केल्या, परंतु खलीलने त्याचाही त्रिफळा उडवला. अय्यर ९ धावांवर बाद झाला. खलीलने भरपूर धावा दिल्या खऱ्या, परंतु त्याचे विकेट घेण्याचे सत्र सुरू राहिले. पुढील षटकात त्याने मार्कस स्टॉयनिसला ( ४) माघारी पाठवून पंजाबची अवस्था ३ बाद ५४ अशी केली. १९ चेंडूंत अर्धशतक झळकावणारा तो पंजाब किंग्सचा तिसरा फलंदाज ठरला. यापूर्वी लोकेश राहुल ( २०१९) व वीरेंद्र सेहवाग ( २०१४) यांनी हा पराक्रम केला आहे.
पंजाब किंग्जकडून सर्वात जलद अर्धशतकं१४ चेंडू – के. एल. राहुल विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, २०१८
१७ चेंडू – निकोलस पूरण विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, २०२०
१८ चेंडू – प्रभसिमरन सिंग विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, २०२४
१९ चेंडू – डेव्हिड मिलर विरुद्ध राजस्थान रॉयल्स, २०१४
१९ चेंडू – के. एल. राहुल विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, २०१९
१९ चेंडू – प्रियांश आर्य विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, आज
प्रियांशने दिल्लीच्या स्थानिक ट्वेंटी-२० लीगमध्ये सहा चेंडूत सहा षटाकर खेचले होते. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत त्याने दिल्लीकडून ९ सामन्यांत सर्वाधिक ३२५ धावा केल्या होत्या.