इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सने ईडन गार्डन्सवर मंगळवारी (८ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्सला फक्त ४ धावांनी पराभूत केले. शेवटच्या षटकापर्यंत हा अत्यंत रोमांचक सामना झाला.
चौकार-षटकारांची आतिषबाजी या सामन्यात पाहायला मिळाली. या संपूर्ण सामन्यात २७० पेक्षा जास्त धावा आणि २५ षटकार मारण्यात आले. त्यातही शार्दुल ठाकूरने गोलंदाजी केलेले १३ वे षटक चर्चेत राहिले.
या सामन्यात कोलकातासमोर लखनौने २३९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताने २० षटकात ७ बाद २३४ धावा केल्या. कोलकाताने तिसऱ्या षटकात क्विंटन डी कॉकची (१५) विकेट गमावल्यानंतर अजिंक्य रहाणेने आक्रमक खेळ केला होता. त्याने आधी सुनील नरेनला साथीला घेतले, त्याच्यासह फलंदाजी करत संघाला ६ षटकात ९० धावा करून दिल्या.
नरेन ३० धावांवर बाद झाल्यानंतर वेंकटेश अय्यरसोबत अर्धशतकी भागीदारी केली. रहाणेने २६ चेंडूतच अर्धशतक केले. तो ज्याप्रकारे खेळत होता, त्यावरून कोलकाताचा आशा जिवंत होत्या. यावेळी १३ व्या षटकात शार्दुल ठाकूर गोलंदाजीला आला. त्याने स्ट्राईकवर असलेल्या रहाणेला वाईड चेंडू टाकून फसवण्याचा प्रयत्न केला.
पण या नादात त्याने चक्क सुरुवातीचे पाच चेंडू सलग वाईड टाकले. त्यामुळे कोलकाताला ५ अतिरिक्त धावा मिळाल्या. त्यानंतर त्याने चांगली गोलंदाजी केली होती. त्याच्या नंतच्या ५ चेंडूवर एका चौकारसह ८ धावा निघाल्या. अखेर या षटकाच्या शेवटच्या अधिकृत चेंडूवर त्याने रहाणेला फुलटॉसवर चूक करायला भाग पाडले.
रहाणेला निकोलस पूरनच्या हातून झेलबाद केले. पूरनने एक्स्ट्रा कव्हरला रहाणेचा झेल घेतला. रहाणेने ३५ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह ६१ धावांची खेळी केली. तो बाद झाल्यानंतर मात्र, कोलकाताने नियमित अंतराने विकेट्स गमावल्या.
शेवटी रिंकु सिंगने झुंज दिली, पण कोलकाताला विजय मिळवता आला नाही. वेंकटेश अय्यर २९ चेंडूत ४५ धावा करून बाद झाला. रिंकु सिंग १५ चेंडूत नाबाद ३८ धावा केल्या.
तत्पुर्वी, लखनौने २० चेंडूत ३ बाद २३८ धावा केल्या होत्या. लखनौकडून निकोलस पूरनने ३६ चेंडूत नाबाद ८७ धावा केल्या, तर मिचेल मार्शने ४८ चेंडूत ८१ धावा केल्या. एडेन मार्करमनेही २८ चेंडूत ४७ धावा केल्या.