- डॉ. सचिन जैन, संस्थापक संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड
आपल्या यशामध्ये कित्येक लोकांचा वाटा असतो याचे भान ठेवावे. आपल्यापेक्षा वडीलधारी, सहकारी तसेच वयाने लहान असेल परंतु गुणाने मोठे असलेल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल आदर असावा. आपण दुसऱ्या व्यक्तीचा आदर करू तेवढा आदर समोरची व्यक्ती आपला करते. वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवनात याचा फायदा निश्चितच होतो. यशस्वी भविष्यासाठी बाकीच्या कौशल्याप्रमाणे हे महत्त्वाचे आहे.
दुसऱ्याची प्रशंसा करणे हे माणसाच्या मूलभूत गुणधर्मात तसे कमीच आहे. आपण अतिशय सहजतेने दुसऱ्याचा चुका काढून त्यावर टीका करून, मत प्रदर्शित करून मोकळे होते. तितक्याच सहजतेने कुणाची प्रशंसा करून त्याला शाबासकी देणे होते नाही.
हे जन्मजात नसेल, तरी ही कला शिकून, अनुभवणे, दुसऱ्याला अनुकरणीय आत्मसात करता येऊ शकते. थोडे प्रयत्न, मुद्दाम वेगळे ठरवून केले तर निश्चितच शक्य आहे. याचा अर्थ कुणाची खोटी प्रशंसा करणे असे नाही. परंतु या लहान लहान हावभावामधून आपण कुणालातरी प्रोत्साहित करत असतो आणि त्याची सकारात्मक ऊर्जा नकळत आपल्यामध्येही येते आणि त्याला मिळालेली प्रेरणा तुमच्याही मदतीला येऊ शकते.
मराठीत एक म्हण आहे, ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ - नक्कीच. परंतु निंदा करताना आपण त्याला हताश तर नाही ना करत याचे भान ठेवून, तुमचे मत विचारले असेल तरच आपले निरीक्षण समजेल अशा भाषेत सांगितल्यास त्याचा प्रभाव सकारात्मक होतो.
प्रशंसा - निंदा- याचा करिअरमध्ये यशस्वीरीत्या पुढे जाण्यासाठी काय उपयोग? तर, तुम्ही तुमच्या क्षेत्रात हुशार, प्रगल्भ, कौशल्यपूर्ण असला तरी पुढची वाटचाल ही एकट्यावर अवलंबून नसते, तर भोवतालच्या असंख्य व्यक्तींवर ज्यांचे व्यक्तिमत्त्व वेगवेगळे असू शकते त्यांच्यावरही अवलंबून असते. आणि ही ‘सॉफ्ट स्किल्स’ त्यासाठी उपयोगी आहेत.
अनेकदा आपण खासगी किंवा व्यावसायिक जीवनात छोट्या गोष्टी गृहीत धरतो. मात्र भान ठेवून त्या-त्या वेळेस सकारात्मक उत्तर, टिप्पणी दिल्यास त्याचा आपल्या कामात अधिक फायदा होतो. मिळालेल्या प्रोत्साहनाने काम दुप्पट वेगाने आणि जोशाने होते.
हे पालकांनी देखील लक्षात ठेवण्यासारखे आहे. जेवढे आपण पाल्यांना प्रोत्साहित करू तेवढ्या जोमाने ते प्रयत्न करतील, याउलट त्यांचे मन नसेल आणि तुम्ही त्यांच्यावर काही लादायचा प्रयत्न केला तर त्याचे नकारात्मक उत्तर मिळण्याची शक्यता जास्त असते.
व्यावसायिक जीवनात देखील आपल्यापेक्षा वरिष्ठ असो वा कनिष्ठ, प्रत्येकाच्या मताचे आदर करून, मीमांसा करूनच निर्णय घेतला तर प्रत्येकाला आपण हातभार लावल्याचा आनंद मिळतो आणि भविष्याचे ते अजून जोमाने प्रगत करतात. वैयक्तिक तसेच सामूहिक यशाची ही गुरुकिल्ली आहे.