आयुर्वेदातील जागतिक संधी ओळखा!
esakal April 09, 2025 09:45 AM

- वैद्य सुकुमार सरदेशमुख, आयुर्वेदतज्ज्ञ

वैद्यकशास्त्रात दिवसागणिक प्रगती होत असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसतो. परंतु, असे असले तरीही आयुर्वेदावरील नागरिकांचा विश्वास आणि त्याचा उपचारपद्धती म्हणून होत असलेला स्वीकार कुठेही कमी झालेला नाही. आयुर्वेदातील नवनवीन शोध, उपचारपद्धती आणि होत असलेले प्रयोग यामुळे या शास्त्राचा प्रचार-प्रसार होताना दिसत असून, त्याकडे करिअरचा पर्याय म्हणूनही पाहिले जात आहे.

आयुर्वेदाची वैशिष्ट्ये कोणती?

आयुर्वेद रोगाला समूळ नष्ट करू शकतं. त्यातही मनुष्याला व्याधी जडूच नये हा आयुर्वेदाचा प्रयत्न असतो. आयुर्वेदानुसार दैनंदिन जीवन ठेवल्यास माणसाला जडणारे निम्म्याहून अधिक आजार नाहीसे होतील किंवा ते जडणारच नाहीत. आयुर्वेद शरीर, मन आणि आत्मा या तीनही गोष्टींवर मान्य करतं.

मधुमेह, रक्तदाब वगैरे आजारांवर सध्या खूप संशोधन होताना दिसतं. मात्र, आयुर्वेदात हे फार पूर्वीच झालं आहे. आयुर्वेद भारतीय शास्त्र असून, त्यात नैसर्गिक साधनांचा वापर केलेला असतो. त्याचा कोणताही दुष्परिणाम, वेगळा-विरुद्ध परिणाम होत नाही, ही फार महत्त्वाची बाब आहे.

आपण यात काम करावं असं तुम्हाला का वाटलं?

आमच्या घरी वैद्यपरंपरा आहे आणि आयुर्वेद रुजलेला आहे. त्यामुळे मी लहानपणापासून त्या वातावरणात वाढलो. माझ्यावर ते संस्कार झाले. अष्टविध परीक्षांपैकी नाडीपरीक्षा खूप महत्त्वाची असते. ती आमच्या घरी गुरुकुल पद्धतीने शिकवली जाते. नाडीपरीक्षेतली माझी आता अकरावी पिढी आहे. मला हे ज्ञान माझ्या वडिलांनी दिलं, त्यांना त्यांच्या वडिलांनी दिलं होतं. ही परंपरा अशाप्रकारे सुरू आहे. या पार्श्वभूमीमुळे मी आयुर्वेदातच अधिक संशोधन व रुग्णचिकित्सा करायचं ठरवलं.

आयुर्वेदात काम करताना कोणती कौशल्ये अंगी असावीत?

आपलं ज्ञान हे खणखणीत आणि परिपूर्ण असावं. पाया भक्कम असावा. उपचारपद्धती ठरलेली असावी. मॉडर्न मेडिसिनमध्ये जसं स्पेशलायजेशन असतं, तसं आपण आपली एखादी उपचारपद्धती ठरवून तिचा विशेषत्वाने अभ्यास करायला हवा. मग त्यात नाडीपरीक्षा, उदरपरीक्षा, जिव्हापरीक्षा असं काहीही असू शकतं. प्राचीन ग्रंथ म्हणजे ‘संहिता’ या संस्कृत मध्ये आहेत. त्यामुळे संस्कृतचा अभ्यास करणं फायदेशीर ठरतं. ‘सत्वावजय चिकित्सा’ म्हणजे थोडक्यात तुम्हाला रुग्णाचं समुपदेशन करता यायला हवं. त्याला रोगाची, औषधांची माहिती नीटपणे देऊन त्याच्याशी संवाद साधता यायला हवा.

रुग्णपरीक्षा करताना...

  • तुम्ही आयुर्वेदाचा वापर करत असल्यास पूर्णतः त्याच उपचारपद्धतीवरच भर द्या.

  • आयुर्वेदाला आज जगभरात मान्यता मिळाली असून, संधीही खूप आहेत. त्या वेळीच ओळखा.

  • पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्याक्षिकावर भर द्या. त्यात अधिकाधिक प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न करा.

  • कर्करोगासारख्या असाध्य व्याधींमध्ये अधिकाधिक संशोधन करण्याचा प्रयत्न करा.

(शब्दांकन : मयूर भावे)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.