मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि देशाचा सर्वात मोठा शत्रू तहव्वूर राणा याला आज भारतात आणण्यात येत आहे. त्याला एका खास विमानाने भारतात आणण्यात येणार आहे. दिल्ली आणि मुंबई यापैकी एका शहरातील तुरुंगात त्याला ठेवण्यात येईल. त्यासाठी तुरूंग प्रशासनाबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राणाला भारतात आणल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेसमोर (NIA) हजर करण्यात येईल. एनआयए त्याच्याकडे मुंबई हल्ल्याशी संबंधित चौकशी करेल. तहव्वूर राणा हा मूळचा पाकिस्तानी नागरिक आहे. तो लष्कर-ए-तैयब्बा या संघटनेचा सदस्य आहे. त्याने 26/11 मुंबई हल्ल्यात अमेरिकेतील दहशतवादी डेव्हिड हेडली याची मदत केली होती.
राणाकडे कॅनडाचे नागरिकत्व
तहव्वूर राणा याच्याकडे कॅनाडा या देशाचे नागरिकत्व आहे. त्याने पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ISI सह मुंबईवर हल्ल्याचा कट रचला होता. राणा याने दाऊद गिलानी उर्फ डेव्हिड कोलमॅन हेडली याची मदत केली होती. त्याने हल्ल्यापूर्वी मुंबईतील काही ठिकाणांची रेकी केली होती.
26/11 मुंबई हल्ल्यानंतर एका वर्षानंतर FBI ने शिकागो येथून राणा याला अटक केली होती. राणा आणि त्याचा मित्र डेव्हिड कोलमन हेडली या दोघांनी मुंबईतली हल्ल्याच्या ठिकाणांची रेकी केली होती. त्यानंतर दहशतवाद्यांनी हे हल्ले केल्याचे तपासात समोर आले होते. मुंबई हल्ल्यातील मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानचा सर्वोच्च सैन्य किताब देण्याची मागणी त्याने पाकिस्तान सरकारकडे केली होती. स्वतःच्या प्रत्यर्पणाविरोधात त्याने अमेरिकेतील जवळपास सर्वच न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. तिथल्या सर्वोच्च न्यायालयात त्याचे अपिल फेटाळल्यानंतर त्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला.
ट्रम्पने केली होती भारताकडे सोपविण्याची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेचा दौरा केला होता. त्यांची भेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झाली होती. या भेटीदरम्यान ट्र्म्प यांनी राणा याला भारताला सोपविण्याची घोषणा केली होती. राणा याला अमेरिकेतून भारतात आणण्याच्या योजनेवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डौभाल आणि गृहमंत्रालय काम करत आहे. राणा हा 63 वर्षांचा असल्याचे समोर आले आहे.
मुंबई हल्ल्यात 166 जणांचा मृत्यू
मुंबईत पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यामागे पाकिस्तानची गुप्तहेर संघटना असल्याचे समोर आले होते. त्यासाठी अनेकांनी मदत केली होती. या हल्ल्यात एकूण 166 जणांना प्राण गमवावे लागले होते. यामध्ये काही परदेशी नागरिकांचा पण मृत्यू झाला. त्यात सहा अमेरिकन नागरिकांचा समावेश आहे. न्यायाधीशांच्या पीठाने राणावर जे आरोप लावण्यात आले आहे, त्याच्या पुढील तपासासाठी त्याचे प्रत्यार्पण आवश्यक असल्याचे निरीक्षण नोंदवले होते.