Deenanath Mangeshkar Hospital MNC Pune took action and similliar cases in Mumbai Pune Nagpur
Marathi April 09, 2025 10:24 PM


मुंबई : गर्भवती तनिषा भिसे यांचा डिपॉझिटअभावी उपचार न झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला यासाठी कारणीभूत धरण्यात आले. यानंतर पुणे महानगरपालिकेला जाग आली आणि त्यांनी तब्बल 22 कोटी रुपयांचा कर थकवल्याप्रकरणी मंगेशकर रुग्णालयाला नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा घटना घडल्यानंतर पालिका जागी होणार का? असा सवाल विचारण्यात येत आहे. याच घटनेप्रमाणे याआधीही असेच काही प्रकार हे मुंबई, पुणे तसेच नागपूर महापालिकेनेदेखील केल्याचे समोर आले होते. (Deenanath Mangeshkar Hospital MNC Pune took action and similliar cases in Mumbai Pune Nagpur)

हेही वाचा : Bjp Pune : चंद्रकांतदादा अन् मोहोळांकडून तोडफोड करणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांचे समर्थन, मेधा कुलकर्णी भाजपच्या बैठकीतून निघून गेल्या 

वरळी हिट अँड रन

गेल्या वर्षी जुलै महिन्यात मुंबईतील वरळीमध्ये एक मोठी दुर्घटना घडली होती. या भागात एका भरधाव वेगाने असलेल्या एका गाडीने दुचाकीला धडक दिली होती. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. गाडी चालवणारा आरोपी मिहीर शाहने जुहू परिसरात असलेल्या व्हाईस ग्लोबल तपस बारमध्ये मद्यप्राशन केल्याचे समोर आले होते. त्यानंतर तो वरळीच्या दिशेने निघाला असताना हा अपघात घडला. ही सर्व घटना समोर आल्यानंतर या बारकडून नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे सांगत उत्पादन शुल्क विभागाने या बारचा परवाना रद्द करत त्याला सील ठोकले. यासोबतच पालिकेने या बारचे जवळपास 3500 चौ.फुटांचे अनधिकृत बांधकामही तोडण्यात आले.

पुण्यातील ड्रग्स पार्टी प्रकरण

गेल्या वर्षी जून महिन्यात पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील एल 3 लिक्विड लिजर लाऊज या पबमध्ये काही मुले ड्रग्स घेत असल्याचे समोर आले होते. यासंदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने कारवाईची हातोडा उचलला होता. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून पुणे महानगर पालिकेने एफसी रोडवरील अनधिकृत पब, बारवर कारवाई केली होती. त्यावेळेसही पार्टी प्रकरण समोर आल्यानंतर पालिकेने कारवाई केल्याचे समोर आले होते.

नागपूर हिंसाचार प्रकरणात पालिकेची कारवाई

काही दिवसांपूर्वी म्हणजेच या वर्षीच्या मार्च महिन्यात नागपूरमध्ये हिंसाचार झाला. यावेळी काही समाजकंटकांनी पोलिसांवर दगडफेक करत हल्ला केला होता. या प्रकरणानंतर हिंसाचारातील कथित मास्टर माईंड फहीम खानचे राहते घर नागपूर महापालिकेने जमीनदोस्त केले. महापालिकेने त्याच्या घरावर बुलडोझर चालवत कारवाईची बडगा उगारला. त्यानंतर याच घटनेतील दुसरा आरोपी अब्दुल हफिज शेखच्या जोहरीपुरा परिसरातील घरावर कारवाई केली. दोन्हीही घरे अनधिकृत असल्याचे सांगत ही कारवाई करण्यात आली. यावेळीही नागपूर पालिकेने उशीर का केला? असा सवाल उपस्थित करण्यात आला.

याआधीही पालिकेची तीच तऱ्हा

फक्त आताचा नव्हे तर याआधीही अनेकदा पालिकेने केलेल्या उशिरा केलेल्या कारवाया चर्चेत आल्या आहेत. 2017 मध्ये सुप्रसिद्ध आरजे मलिष्काने मुंबईच्या खड्ड्यांवरील एक गाणे रेडीओ तसेच इतर सोशल मीडियावर प्रसिद्ध केले. त्यावेळेस शिवसेना ही महापालिकेमध्ये सत्तेत होती. तेव्हा तिच्या घरावर डेंग्यूच्या अळ्या सापडल्याचे सांगत कारवाई केली होती. तसेच, महाविकास आघाडी सत्तेत असताना अभिनेत्री कंगना रनौतच्या घरावर आणि कार्यालयावरही अशीच कारवाई केली होती. मुंबई पाकव्याप्त भाग आहे आणि मुंबई पोलिसांबद्दल विधान केल्यामुळे त्यावेळेस शिवसेना आणि कंगना रनौत यांच्यात वाद रंगला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती.

अशामध्ये अनेकदा घटना घडल्यानंतर महापालिकेने उशिरा कारवाई केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता उशिरा जाग येण्याचा सिलसिला सुरुच असल्याची चर्चा आहे.



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.