Tahawwur Rana : 26/11 हल्ल्याचा सूत्रधार भारताच्या ताब्यात; राणासाठी 'कसाबचा सेल' तयार, अमित शहा डोवाल यांची बैठक
esakal April 10, 2025 01:45 PM

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वुर हुसैन राणाला आज भारतात आणलं जाणार आहे. अमेरिकेकडून राणाला भारताकडे प्रत्यार्पण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. राणाला आणण्यासाठी भारतीय टीम अमेरिकेला गेलीय. गुरुवारी दुपारपर्यंत राणाला घेऊन पथक भारतात पोहोचेल. राणासाठी मुंबईत ऑर्थर रोड जेलमधील एक सेल रिकामा करण्यात आला असल्याची माहिती समजते. अजमल कसाबला त्या सेलमध्ये ठेवलं होतं.

तहव्वुर हुसैन राणा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन उद्योगपती आहे. त्याच्यावर डेविड हेडलीच्या मदतीने दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याचा आणि रेकी केल्याचा आरोप आहे. हेडलीने लष्कर ए तय्यबाच्या सांगण्यावरून मुंबईत हल्ले करण्यासाठी प्रमुख ठिकाणांची रेकी केली होती. २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या मुंबईवरील हल्ल्यात १६६ निरपराध लोकांचा बळी गेला होता. यात ६ अमेरिकन नागरिकांचाही समावेश होता.

राणा भारत पोहोचताच त्याला दिल्लीच्या पाटीयाला हाऊसमधील एनआयए कोर्टात हजर केले जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव राणाला व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कोर्टात हजर केले जाईल. एनआयए त्याच्या कोठडीची मागणी करेल. राणाची सखोल चौकशी करण्यात येईल. तपास यंत्रणेकडं असलेले ईमेल्सचे पुरावे, प्रवासाची माहिती आणि साक्षीदारांच्या जबाबाच्या आधारे राणाला प्रश्न विचारले जातील.

राणाला भारतात आणण्याआधी मुंबईतील ऑर्थर रोड जेलमधला सेल रिकामा करण्यात आला आहे. तरीही सुरक्षेच्या कारणास्तव त्याला सध्या तिहारच्या हाय सिक्युरीटी सेलमध्ये ठेवलं जाणार आहे. तिहार जेलची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. अमेरिकेला भारतानं आधीच आश्वासन दिलं होतं की राणाला योग्य कायदेशीर अधिकार आणि सुऱक्षा पुरवली जाईल.

राणाला जर खटल्यासाठी मुंबईला आणलं गेलं तर त्याला ऑर्थर रोड जेलमधील १२ नंबरच्या बराकीत ठेवलं जाऊ शकतं. याच ठिकाणी मुंबई दहशतवादी हल्ल्यातला जिवंत पकडलेला दहशतवादी अजमल कसाबला ठेवलं होतं. फाशी देण्याआधी अजमल कसाब या बराकीत होती. बॉम्ब प्रूफ अशी ही बराकी आहे. ऑर्थर रोड तुरुंगातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, अद्याप काही निर्देश आलेले नाहीत. त्याला इथं आणलं तर कुठं ठेवायचं त्याबाबत निर्णय घेतला जाईल.

राणाच्या प्रत्यार्पणाची तयारी सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री जयशंकर एनएसए अजित डोभाल यांची बैठक झाली. बैठकीत गुप्तचर विभागाचे तपन डेका आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री हेसुद्धा उपस्थित होते. या बैठकीत काय चर्चा झाली हे समोर आलं नाहीय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.