सातारा : सभासदांना न्याय मिळवून देण्यासाठी सह्याद्री कारखान्याची निवडणूक लढवली. या निवडणुकीत अपयश आले तरी मला कुठलाही तोटा झाला नाही. मागील काही वर्षांत साडेनऊ हजार मयत सभासदांची वारस नोंदी झाली नसल्याने आमच्या बाजूने मतदानाचा टक्का कमी झाला. त्यामुळे कारखान्याने या नोंदी करा अन् पुन्हा निवडणूक लावा, मग निवडणुकी जिंकली नाही, तर आमदारकीचा राजीनामा देईन, असे आव्हान कऱ्हाड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांना आज पत्रकार परिषदेत दिले.
श्री. घोरपडे म्हणाले, ‘‘सह्याद्री कारखाना जिंकला म्हणजे महाराष्ट्र जिंकल्याचा आविर्भाव आणला जात आहे. सहकारातील निवडणुकीत कुठलेही राजकारण आणायचे नसते. मात्र, या निवडणुकीत कारखान्याच्या सत्ताधाऱ्यांनी केवळ राजकारण करून दिशाभूल केली. आम्ही सभासदांसाठी लढलो.
मात्र, ते स्वत:च्या फायद्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे दिसून आले.’’ दरम्यान, विद्यमान संचालक आणि चेअरमन यांनी मृत संचालकांच्या वारस नोंदी जाणीवपूर्वक दाबून ठेवल्या आणि ज्या नोंदी त्यांनी करून घेतल्या ते त्यांच्याच गटातील होते. विरोधी गटातील नोंदी त्यांनी होऊ दिल्या नाहीत, असा आरोपही मनोज घोरपडे यांनी केला.
कारखान्याने गेल्या वर्षीपासून सात रुपयांची साखर दहा रुपये केली होती. मात्र, निवडणुकीच्या ऐन काळात सभासदांना मोफत साखर देण्याचे आश्वासन देण्यात आले. पॅनेल टाकताना पैशाचा वापर विरोधकांनी केला असेल तर सर्वांनी त्याचा शोध लावला पाहिजे, असेही घोरपडे यांनी सांगितले.
दहा हजार मतदान विरोधात
सह्याद्री निवडणुकीत मतदान झालेल्यापैकी दहा हजार मतदान कारखान्याच्या सत्ताधाऱ्यांविरोधात गेले आहे. त्यामुळे विरोधकांना पडलेल्या मतांची आकडेवारीही पाहणे आवश्यक आहे. त्यामुळे विरोधकांना पडलेली मते विचारात घेण्यासारखे असल्याचे मनोज घोरपडे यांनी सांगितले.