आपल्यापैकी बरेच जण नारळाचं तेल केवळ केसांसाठीच उपयुक्त आहे असं मानतात. मात्र तुम्हाला आश्चर्य वाटेल की, हे तेल चेहऱ्यासाठीही तेवढंच प्रभावी ठरू शकतं! विशेषतः रात्री झोपण्याआधी याचा योग्य वापर केल्यास त्वचेवर अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतात.
त्वचेचं पुनरुत्थान रात्रीच जास्त प्रभावी!
तज्ज्ञ सांगतात की रात्री झोपताना त्वचेत पुनरुत्पादनाची प्रक्रिया वेगाने सुरू होते. याच वेळी जर चेहऱ्यावर नारळाचं तेल लावलं गेलं, तर ते त्वचेला खोलवर पोषण देतं आणि निखार आणतं.
कोरडी, निर्जीव त्वचा होते मऊ आणि तजेलदार
नारळाच्या तेलामध्ये असतात पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई सारखे पोषक घटक. हे घटक त्वचेचा कोरडेपणा दूर करत मृदूता प्रदान करतात. थंडीत किंवा उन्हाळ्यात त्वचा कोरडी पडते, अशावेळी हे तेल वरदान ठरू शकतं.
सुरकुत्यांवर प्रभावी उपाय
चेहऱ्यावर पडणाऱ्या सुरकुत्या आणि फाईन लाईन्स यासाठीही नारळाचं तेल प्रभावी आहे. यामध्ये असणारे अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेला वृद्धत्वाच्या लक्षणांपासून वाचवतात. व्हिटॅमिन ई त्वचेला लवचिक ठेवतं आणि डाग कमी करतं.
कसं वापराल नारळाचं तेल?
दिवसभरातील धूळ, घाम आणि मेकअपचा थर त्वचेला त्रासदायक ठरू शकतो, म्हणून चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कोरड्या टॉवेलने चेहरा हलक्या हाताने पुसा.आता थोडंसं नारळाचं तेल तुमच्या हातावर घ्या. दोन्ही हात एकमेकांवर चोळून तेल किंचित कोमट करा. मग हे तेल चेहऱ्यावर लावा. तेल लावताना हलक्या हाताने गोलाकार मालिश करा. यामुळे तेल त्वचेत खोलवर शोषले जाईल आणि रक्ताभिसरणही सुधारेल.हे तेल रात्रभर चेहऱ्यावर ठेवणं सर्वात फायदेशीर असतं. कारण रात्रीच्या वेळेस त्वचेची पुनरुत्पादन प्रक्रिया अधिक सक्रिय असते. सकाळी उठल्यावर सौम्य फेसवॉशने चेहरा धुवा.
शतकानुशतकांपासून वापरलं जाणारं नारळाचं तेल आता आधुनिक विज्ञानानेही त्वचेसाठी उपयुक्त असल्याचं मान्य केलं आहे. त्यामुळे रासायनिक उत्पादनांपेक्षा हा नैसर्गिक उपाय अधिक सुरक्षित आणि फायदेशीर ठरतो.