– प्रेमानंद बच्छाव
Kesarkar On Uddhav Thackeray : मुंबई : मुख्यमंत्री असताना कोकणच्या भल्याचा एकही निर्णय न घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांचे कोकणी माणसावर बेगडी प्रेम असल्याची टीका शिवसेना प्रवक्ता दीपक केसरकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. दुर्लक्षित कोकणाबद्दल उद्धव ठाकरे यांना किती आत्मीयता होती हे आपण जवळून अनुभवल्याचेही त्यांनी सांगितले. (shivsena leader deepak kesarkar criticises ubt chief uddhav thackeray over konkan)
उद्धव ठाकरे यांनी नुकताच आपण कोकण दौरा करणार असल्याचे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर केसरकर यांनी मंगळवारी ठाकरे गटावर टीका केली. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने कोकणातील शेतकऱ्यांसाठी काजू बोर्डाच्या संदर्भात समिती नेमली होती. तेव्हा अर्थ राज्यमंत्री या नात्याने आपण या समितीचे अध्यक्ष होतो. काजूचे धोरण कोकणचा कायापालट करणारे धोरण होते. मात्र, अडीच वर्षांच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कधीही त्या धोरणाला मंजुरी दिली नाही, असा आरोप केसरकर यांनी केला.
हेही वाचा – E-Cabinet : मंत्र्यांसाठी एक कोटींच्या आयपॅडची खरेदी, ई कॅबिनेटसाठी राज्य सरकारचा निर्णय
चांदा ते बांदा योजना अर्थ खात्याने बंद केली होती. ती पुन्हा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे आदेश आवश्यक होते. मात्र तेव्हाही उद्धव ठाकरे मूग गिळून गप्प बसले. कोकणाच्या विकासासाठी एक शब्द देखील त्यांनी उच्चारला नाही, ही वस्तुस्थिती आहे. याउलट एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर लगेचच काजू बोर्डाला 1 हजार 500 कोटींचा निधी दिला. काजू उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने पहिल्यांदाच आर्थिक मदत केली, अशी माहिती केसरकर यांनी दिली.
कोकणात जे प्रकल्प आले त्याला विरोध करण्यात ठाकरे गट आघाडीवर होता. या विरोधामुळे कोकणी तरुणांचे रोजगार बुडाले. कोकण विकासापासून वंचित राहिला. त्यामुळे कोकणी जनता कधीच तुमच्या सोबत असणार नाही, असा इशारा केसरकर यांनी ठाकरे गटाला दिला.
हेही वाचा – Congress : महाराष्ट्रातील निवडणुकाही तुम्ही दगाफटक्याने जिंकलात, कार्यकारिणीच्या बैठकीत का भडकले खर्गे?
Edited by : Ashwini A. Bhatavdekar