अहमदाबाद : काँग्रेसने संघटनात्मक बदलासाठी कठोर निर्णयांचे स्पष्ट संकेत अधिवेशनातून दिले. "जे पक्ष कार्यात हातभार लावत नाहीत त्यांनी आता विश्रांती घ्यावी. काम करणार नसाल तर निवृत्त व्हा", असा सज्जड दम काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी निष्क्रिय नेत्यांना भरला. या वेळी खर्गे यांनी महाराष्ट्रातील निवडणूक फ्रॉड (गैरप्रकार) आहे आणि हा गैरप्रकार लोकशाही उध्वस्त करणारा आहे, असा खळबळजनक आरोपही केला.
काँग्रेसचे साबरमतीच्या काठावर राष्ट्रीय अधिवेशन आज झाले. अधिवेशनाचे उद्घाटन करताना खर्गे यांनी हा इशारा दिला. पक्षाची काल कार्यकारिणी बैठक झाली. यानंतर संसदीय पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्य, काँग्रेसशासित राज्याचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, अखिल भारतीय महासमितीचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत अधिवेशन झाले.
खर्गे यांनी जिल्हाध्यक्षांच्या बैठकीचा संदर्भ दिला. ते म्हणाले, उमेदवार निवडीत जिल्हाध्यक्षांना सहभागी करून घेतले जाईल. त्यांनी निष्पक्षपणे संघटना बांधणी करावी. महाराष्ट्रात मतदारयाद्यांमध्ये फेरफार झाल्याचा आरोप करताना खर्गे म्हणाले, की महाराष्ट्र निवडणुकीशी संबंधित मुद्दा राहुल गांधी यांनी संसदेत आणि माध्यमांसमोर मांडला. काँग्रेस पक्षाने हा मुद्दा उपस्थित केला, पण सरकारवर काहीही परिणाम झाला नाही.
महाराष्ट्र विधानसभा आणि लोकसभा निवडणूक यात लाखो मतदार अचानक वाढले. हा असा कसा निवडणूक आयोग? ही लोकशाही नेमकी कुठे चालली ? सगळं काही बनावट तयार करून निवडणूक जिंकली गेली. ही एक प्रकारची फसवणूक आहे. आणि लोकशाहीवर घातलेली मोठी घाव आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जी फसवणूक झाली, तशी देशात यापूर्वी घडलेली नाही. ही फसवणूक लोकशाहीला उद्ध्वस्त करण्यासाठीच करण्यात आली. परंतु, पक्ष मतदारयादीतील गैरप्रकारांविरुद्ध आक्रमक राहील असे खर्गे यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील मतदार यादीवर शंका व्यक्त करताना खर्गे म्हणाले, महाराष्ट्र आणि हरियानात कमी प्रमाणात गडबड झाली असेल, पण महाराष्ट्रात भाजपने ९० टक्के जागा जिंकणे अविश्वसनीय आहे. संघटनात्मक बदलावर खर्गे यांनी सांगितले की, जे लोक पक्षात असूनही कोणतेही काम करत नाहीत, त्यांनी आता विश्रांती घ्यावी किंवा निवृत्त व्हावे.
त्यांचा इशारा गटबाजीला चालना देणाऱ्या काही वरिष्ठ नेत्यांकडे होता. विशेष म्हणजे खर्गे यांच्या निष्क्रिय नेत्यांना निवृत्त करण्याच्या विधानावर सर्वाधिक टाळ्या पडल्या. ‘‘जिल्हाध्यक्षांचे अधिकार वाढवले जात आहेत आणि त्यांना एका वर्षात संघटना उभी करायची आहे. जिल्हाध्यक्षांनी टीम निवडताना पूर्णपणे निष्पक्षता ठेवावी ,’’ असे ते म्हणाले.
खर्गे यांचे टीकास्त्र
सांप्रदायिक शक्तींना उत्तर देण्याची जबाबदारी काँग्रेसवरच
अकरा वर्षांपासून भाजप राज्यघटनेवर हल्ला करत आहे
राहुल गांधींना बोलू दिले नाही ही लाजिरवाणी गोष्ट
जनतेच्या मुद्द्यांवरून लक्ष वळविण्यासाठी ध्रुवीकरण
मोदींच्या मित्रांना सुखरूप ठेवण्यासाठी देशाची संपत्ती विकली जात आहे.
यूपीए सरकारच्या काळात केंद्र व राज्यांमधील संबंध चांगले होते,
आज विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यांना निधी मिळत नाही.
सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांबाबत केलेली टिप्पणी केंद्राला धडा आहे.
कामे मार्गी लावण्यासाठी राज्यपालांना सॅल्युट करण्याची गरज नाही
देशात हळूहळू लोकशाही संपवली जात आहे.
बहुतांश देशांमध्ये ईव्हीएम वापरले जात नाहीत. ही फसवणूक आहे.