Karad : कऱ्हाडच्या १९ गावांचे सांडपाणी कृष्णा नदीत: नागरिकांचे आरोग्य धोक्यात; पंचायत समिती करणार पाण्यावर प्रक्रिया
esakal April 10, 2025 07:45 PM

-सचिन शिंदे

कऱ्हाड : तालुक्यातील कृष्णाकाठावरील १९ गावांतील सांडपाणी कृष्णा नदीत मिसळत आहे. प्रत्येक गावात वेगवेगळी अशी ५२ ठिकाणे आहेत. तेथून ६१ लाख ८३ हजार १५५ लिटर पाणी तयार होते. त्यापैकी कृष्णेच्या पत्रात दररोज २४ लाख दोन हजार ८२८ सांडपाणी मिसळत आहे. त्यातील सुमारे पाच लाख पाच हजार ३७६ लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. उर्वरित पाण्यावर प्रक्रिया करण्याचेही नियोजन पंचायत समितीतर्फे केली जात आहे. कृष्णेत मिसळणारे पाणी तालुक्यातील १९ गावांतील ५६ हजार १९५ लोकवस्ती असलेल्या रहिवाशांकडून मिसळले जात आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

कृष्णा नदीकाठचा सर्व्हे

पंचायत समितीने तालुक्यातील कृष्णा नदीच्या काठावरील गावांचा सर्व्हे केल्यानंतर १९ गावे अशी आहेत, जेथे मोठ्या प्रमाणात सांडपाणी तयार होते. तेथील ६० लाख ८३ हजार लिटर सांडपाणी दररोज तयार होते. त्यातील पाणी कृष्णेच्या पात्रात रोज २४ लाख दोन हजार ८२८ लिटर सांडपाणी वेगवेगळ्या ५२ ठिकाणांहून मिसळत आहे. सांडपाणी नदीत मिसळण्याच्या प्रक्रियेवर सध्या पंचायत समिती काम करत आहे. त्यामुळे मिसळणाऱ्या पाच लाख लिटर पाण्यावर उपाययोजनाही केल्या आहेत. उर्वरित २० लाख लिटर सांडपाण्यावर उपाययोजना करण्याचे प्रयत्न पंचायत समितीतर्फे सुरू आहेत.

अशा आहेत उपाययोजना

तालुक्यातील १९ पैकी अनेक गावांत पंचायत समितीने उपाययोजनाही राबविल्या आहेत. त्यामुळे टेंभू व शेरे या गावात तयार होणारे सांडपाणी त्याच गावात जिरवले जात आहे. यापूर्वी ते पाणी कृष्णेत मिसळले जात होते. टेंभूत एक लाख २६ हजार लिटर तयार होणारे पाणी, तर शेऱ्यात ६६ हजार लिटर तयार होणारे सांडपाणी तेथेच जिरवले जात आहे. त्यासाठी शोषखड्डे, नैसर्गिक पद्धतीने पाणी निचऱ्याचा रूट झोन व पाण्याचे स्थैर्यीकरणासारखे उपाय तेथे राबवले गेले आहेत.

चार गावे पूररेषेत

सर्वे झालेल्या १९ पैकी चार गावे पूररेषेत आहेत. त्यात शेरे, गोंदी, रेठरे खुर्द व वडोली भिकेश्वर या गावांचा समावेश आहे. त्या गावात उपाययोजना राबविण्याचे काम करताना तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यावरही योग्य पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे गटविकाधिकारी प्रताप पाटील यांनी सांगितले.

कृष्णाकाठावरील गावांचा सर्व्हे झाला आहे. उर्वरित नदीकाठच्या गावांचा सर्व्हे होणार आहे. १९ गावांपैकी अनेक गावांत उपाययोजना केल्या आहेत. त्या अजूनही वाढविण्यात येणार आहेत. त्यामुळे सांडपाण्यावर शोषखड्डे, रूट जोन व स्थैर्यीकरणांतर्गत उपाय करण्यास प्राधान्य दिले आहे. अन्य गावांतही त्यावर काम सुरू आहे.

- प्रताप पाटील, गटविकास अधिकारी, कऱ्हाड

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.