पुणे : जिल्ह्यातील उद्योग क्षेत्र गतिमान होत असून आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या तुलनेत २०२४-२५ मध्ये कंपन्यांनी त्यांच्या वृद्धीत सरासरी १०.३६ टक्के वाढ असल्याचे नमूद केले आहे. आर्थिक वर्षात २०२४-२५ हे जिल्ह्याला उद्योग क्षेत्रासाठी कसे होते समजून घेण्यासाठी ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चर’ (एमसीसीआयए) कडून नुकतेच एक सर्वेक्षण घेण्यात आले. त्यात उत्पादन, सेवा आणि व्यापार क्षेत्रातील १५२ कंपन्यांनी सहभाग घेतला होता.
सर्वेक्षणानुसार, सहभागी कंपन्यांपैकी ३१ टक्के कंपन्या निर्यात क्षेत्रातील आहेत. यापैकी ७० टक्के कंपन्यांनी निर्यातीत वाढ झाल्याचे सांगितले. संरक्षण आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रांनी वाहन उद्योगाच्या तुलनेत अधिक वाढीची अपेक्षा दर्शवली आहे. उद्योग प्रकारानुसार उत्पादन क्षेत्राला ११.५५ टक्के वाढीची अपेक्षा आहे, तर व्यापार क्षेत्रात ९.७८ टक्के आणि सेवा क्षेत्रात ९.५७ टक्के वाढीचा अंदाज आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी (एमएसएमई) या वाढीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पुण्याच्या औद्योगिक क्षेत्रात ‘सावध पण सकारात्मक’ असा दृष्टिकोन दिसून येतो, असे एमसीसीआयएने नमूद केले आहे.
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या कंपन्यांचे क्षेत्र- वाहन उद्योग
- संरक्षण
- इलेक्ट्रॉनिक्स
- आयटी
- एआय
- अन्न आणि कृषी
- अभियांत्रिकी
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या कंपन्यांचा प्रकार (टक्केवारीत)सुक्ष्म उद्योग - ४२
लघु उद्योग - २२
मध्यम उद्योग- २६
मोठे उद्योग - १० टक्के
गेल्या आर्थिक वर्षातील प्रगती समाधानकारक असल्याचे उद्योजकांनी नमूद केले आहे. मात्र पुढील काळाची उद्योग क्षेत्राला चिंता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन टॅरिफ धोरण (आयात शुल्क) जाहीर केले आहे. त्याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. या धोरणांचा उद्योग क्षेत्रावर काय परिमाण होर्इल. परिणाम झाल्यास त्यातून बाहेर कसे पडायचे, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही विविध कार्यक्रम आयोजित करत आहोत.
प्रशांत गिरबने, महासंचालक, एमसीसीआयए