धमकीच्या फोननंतर सुरक्षा यंत्रणांची धावपळ
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ला आणि जामा मशिदीला लक्ष्य करून बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आल्याने गुरुवारी सकाळी सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली. धमकी मिळाल्यानंतर दोन्ही ठिकाणी तातडीने तपास सुरू करण्यात आला. सकाळी 9:03 वाजता या स्मारकांच्या परिसरात बॉम्ब असल्याची माहिती देणारा फोन आला. त्यानंतर लगेचच सुरक्षा पथके घटनास्थळी पोहोचली, असे दिल्ली अग्निशमन सेवेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. दोन्ही ठिकाणी कसून तपासणी केली. तथापि, तपासणीदरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. तथापि, या धमकीनंतर पोलीस आणि इतर सुरक्षा एजन्सींनी परिसरात पाळत वाढवली आहे.
दिल्लीतील सुरक्षा परिस्थिती आधीच संवेदनशील आहे. लाल किल्ला आणि जामा मशीद ही दोन्ही भारतातील प्रमुख ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळे असून तिथे दररोज मोठ्या संख्येने पर्यटक आणि भाविक भेट देतात. धमकीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी लोकांना अफवांकडे लक्ष देऊ नका आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. अलिकडच्या काळात देशाच्या विविध भागांमध्ये बॉम्ब धमक्यांच्या घटना घडल्यामुळे प्रशासनाला सतर्क राहण्याची गरज वाढली आहे. सध्या दोन्ही ठिकाणी परिस्थिती सामान्य असून पर्यटकांना कोणताही धोका नसल्याचे प्रतिपादन करण्यात आले आहे.