कसोटी क्रिकेटमध्ये येणार नवा नियम! 60 सेकंदात घ्यावा लागणार निर्णय; नाही तर…
GH News April 12, 2025 01:08 AM

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद कसोटी क्रिकेटमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये एक शिस्त लागणार आहे. पण हा निर्णय लागू होताच कर्णधारांचे मात्र धाबे दणाणले आहेत. कारण आता विचार करण्यासाठी जास्त काही वेळ मिळणार नाही. मिडिया रिपोर्टनुसार, आयसीसी कसोटी क्रिकेटमध्ये घड्याळाचा वापर करण्याच्या तयारीत आहे. यामुळे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला 60 सेकंदात पुढचं षटक टाकण्यासाठी तयार व्हावं लागणार आहे. आयसीसीच्या क्रिकेट कमिटीने कसोटीत दर दिवशी 90 षटकांचा खेळ पूर्ण व्हावा यासाठी हे धोरण अवलंबण्याचं ठरवलं आहे. सध्या हा नियम व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये लागू आहे. म्हणजेच टी20 आणि वनडे क्रिकेटमध्ये या नियमाची काटेकोरपणे अमलबजावणी केली जात आहे. या नियमामुळे कर्णधारांवर दबाव वाढणार आहे. कारण एक षटक संपताच दुसरं षटकं सुरु करण्यासाठी फक्त 60 सेकंद मिळणार आहे. त्यामुळे क्षेत्ररक्षणात बदल किंवा इतर रणनितीसाठी फार वेळ मिळणार नाही. पण अनेकदा कर्णधार क्षेत्ररक्षण बदलताना जाणीवपूर्वक वेळ घेतात. यामुळे वेळ वाया जातो.

आयसीसीने कसोटी क्रिकेटमध्ये नवा नियम लागू केल्यास कर्णधारांना झटपट दुसरं षटक सुरु करावं लागणार आहे. व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये या नियम लागू केल्याने सामने वेळेत संपत असल्याचं दिसून आलं आहे. यासाठी आयसीसी हा नियम कसोटी क्रिकेटमध्येही लागू करण्याच्या तयारीत आहे. व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये या नियमानुसार 60 पासून शून्यापर्यंत घड्याळाची उलटी गणना सुरु होते. या घड्याळाकडे तिसऱ्या पंचांचं लक्ष असते. तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने उशिर केला तर दोन इशारे दिले जातात. पण त्यानंतरही उशिर केला तर मात्र धावांची पेनल्टी लागते. पण या नियमात फलंदाज नवा फलंदाज क्रिजवर येण्यासाठी, ड्रिंक्स ब्रेक किंवा खेळाडू जखमी झाल्यास सूट दिली आहे.

अंडर 19 वर्ल्डकपमध्येही होणार बदल

आयसीसी अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या फॉर्मेटमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहे. सध्या ही स्पर्धा वनडे फॉर्मेटमध्ये खेळली जात आहे. मिडिया रिपोर्टनुसार, आयसीसी आता अंडर 19 वर्ल्डकप टी20 फॉर्मेटमध्ये खेळवण्याच्या तयारीत आहे. पण काही सदस्यांनी आणि क्रिकेट बोर्डांनी वनडे फॉर्मेटच असावा असं सांगितलं आहे. यात काही बदल झाल्यास 2028 पासून लागू होईल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.