वडगावात गुरुवारपासून वसंतचैतन्य व्याख्यानमाला
esakal April 12, 2025 12:45 AM

वडगाव मावळ, ता. ११ ः मावळ शिक्षक प्रबोधन परिवाराच्यावतीने आदर्शांच्या जन्मोत्सव मासानिमित्त १५ ते १७ एप्रिल दरम्यान, वडगाव येथे वसंतचैतन्य व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून, त्यामध्ये विविध विषयांवर आधारित व्याख्याने ऐकण्याची पर्वणी श्रोत्यांना मिळणार आहे.
मावळ शिक्षक प्रबोधन परिवाराचे अध्यक्ष बाबासाहेब औटी, संस्थापक राजूभाऊ भेगडे व शिवाजीराव ठाकर यांनी व्याख्यानमालेची माहिती दिली. वडगाव येथील हरकचंद रायचंद बाफना डीएड कॉलेजमध्ये १५ ते १७ एप्रिल दरम्यान, दररोज दुपारी १२ वाजता ही व्याख्यानमाला होईल. त्यामध्ये मंगळवारी (ता.१५) पुण्यातील परंपरागत व प्राचीन शिक्षण संस्थेचे संस्थापक पुंडलिक वाघ यांचे ‘गुरुकुल ते ग्लोबल : प्राचीन भारतीय शिक्षणाची जागतिक उपयुक्तता’ या विषयावर व्याख्यान होईल. अध्यक्षस्थानी उद्योजक अशोक बाफना तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय नाइकडे उपस्थित राहणार आहेत. बुधवारी (ता.१६) सुप्रसिद्ध लेखक इंद्रजित भालेराव यांचे ‘गावाकडं चल माझ्या दोस्ता’ या विषयावर व्याख्यान होईल. अध्यक्षस्थानी डॉ. विकेश मुथा तर प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते भारत गणेशपुरे उपस्थित राहणार आहेत. गुरुवारी (ता. १७) लेखक व कवी प्रा. प्रवीण दवणे यांचे ‘दीपस्तंभ: मनातले, जनातले’ या विषयावर व्याख्यान होईल. अध्यक्षस्थानी पाचाणे गावचे माजी सरपंच मनोज येवले तर प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी-चिंचवड अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर असतील. गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान, तहसीलदार विक्रम देशमुख, गट शिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, पोलिस निरीक्षक कुमार कदम, प्राचार्या डॉ. अनिता धायगुडे, प्राचार्य हिरामण लंघे, प्रा. अशोक गायकवाड, नायब तहसीलदार गणेश तळेकर, शिक्षण विस्तार अधिकारी शोभाताई वहिले आदी उपस्थित राहणार आहेत. व्याख्यानमालेत दररोज मावळ तालुक्यातील २५ गुणवंत शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. श्रोत्यांसाठी दररोज लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. श्रोत्यांनी या पर्वणीचा लाभ घ्यावा असे आवाहन मावळ शिक्षक प्रबोधन परिवाराने केले आहे. मावळ शिक्षक प्रबोधन परिवाराचे संस्थापक राजूभाऊ भेगडे व शिवाजीराव ठाकर, अध्यक्ष बाबासाहेब औटी, कार्याध्यक्ष तानाजी शिंदे, गोरक्ष जांभुळकर, सचिव अमोल चव्हाण, उपाध्यक्ष रघुनाथ मोरमारे, कार्यवाह सुहास धस, सहकार्यवाह धोंडीबा घारे आदींनी संयोजन केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.