Stanford Sleep Behavior Study: Night Owl आहात? मग हे वाचाच; मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम आहेत धक्कादायक!
esakal April 12, 2025 12:45 AM

Why Night Owls Are More Prone To Depression And Anxiety: रात्री उशिरा झोपायची सवय असेल, तर थोडं सावध होण्याची गरज आहे. आजकाल बरेचजण कामाच्या आंतरराष्ट्रीय वेळांमुळे, नेटफ्लिक्ससारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरचे शोज बघण्यासाठी किंवा फक्त सोशल मीडियावर रील्स बघण्यासाठी रात्री जास्त वेळ जागे असतात.

परंतु ही रात्री उशिरापर्यंत जागे राहण्याची सवय तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. संशोधनानुसार, रात्री १ वाजेपर्यंत जागे राहणे एखादवेळेस ठीक आहे, पण जे लोक त्यांनतर जागे राहून उशिरा झोपत असतील, तर ते त्यांच्या आरोग्यासाठी ते घातक ठरू शकते.

स्टॅनफोर्ड मेडिसिनमधील संशोधक सांगतात, “७५,००० प्रौढ व्यक्तींच्या सर्वेक्षणात त्यांची झोपेची वेळ आणि खरेच ते कधी झोपतात हे तपासण्यात आले. संशोधनातून हे स्पष्ट झाले की, कोणत्याही प्रकारचा झोपेचा कल (chronotype) असो, वेळेवर झोपणे हे सर्वांनाच फायदेशीर आहे. जर कोणी उशिरा झोपत असेल, तर त्यांना मानसिक आणि वागणुकीशी संबंधित त्रास होण्याची शक्यता जास्त असते.”

हे संशोधन युनायटेड नेशनमधील ७३,८८० व्यक्तींवर करण्यात आले व सायकॅट्री रिसर्च (Psychiatry Research) जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. या संशोधनानुसार ७३,८८० व्यक्तींपैकी १९,०६५ जण सकाळी लवकर उठणारे होते, ६,८४४ जण रात्री उशिरा झोपणारे होते, तर उर्वरित ४७,९७९ जण मध्यम प्रवृत्तीचे होते.

या संशोधनातून निष्कर्ष असा निघाला की, सकाळी लवकर उठणारे आणि रात्री उशिरा झोपणारे दोघेही, जर रात्री उशिरा झोपले, तर त्यांच्यामध्ये नैराश्य (Depression) आणि चिंता यासारख्या मानसिक विकरांचा धोका जास्त दिसून आला. पण त्यातही जास्त धोका रात्री उशिरा झोपणाऱ्या लोकांना आहे, असे वरिष्ठ लेखक आणि मानसशास्त्रज्ञ जेमी त्झाईट्सर यांनी मत मांडले.

त्यांच्या मते वेळ आणि मानसिक आरोग्य यामध्ये असणाऱ्या संबंधासाठी अनेक स्पष्टिकरणे असू शकतात.मात्र बहुतेक वेळा हे पहाटेच्या काळात लोक घेत असलेल्या चुकीच्या निर्णयांशी संबंधित असते. जसेकी आत्महत्येचा विचार करणे, हिंसक कृत्य, दारू/अमली पदार्थांचे सेवन आणि अति खाणे यांसारख्या गोष्टी प्रामुख्याने रात्री घडतात.

सकाळी लवकर उठणाऱ्यांचे मानसिक आरोग्य हे सर्वाधिक चांगले आढळले. केवळ झोपेचा कालावधी आणि सातत्य पुरेसे नाही,तर झोपेची योग्य वेळही तितकीच महत्त्वाची आहे, असेही तज्ञ म्हणाले.

लवकर झोपण्याची सवय लावण्यासाठी पुढील गोष्टी आत्मसात करा -

ठराविक झोपेची आणि उठण्याची वेळ ठरवा

रोज ठराविक वेळी झोपण्याची सवय लावा आणि आठड्याच्या शेवटीसुद्धा पाळा. यामुळे शरीरालाही त्याच वेळेवर झोपायला सवय लागते.

बेडटाईम रूटीन ठरवा

झोपण्याआधी वाचन, ध्यान किंवा गरम पाण्याने अंघोळ करणे यासारख्या गोष्टींचे एक रुटीन तयार करा ज्यामुळे झोपण्यापूर्वी मन शांत होईल आणि शांत झोप लागेल.

स्क्रीनपासून दूर राहा

मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉप यांचा वापर झोपण्याच्या किमान १ तास आधी थांबवा. यामुळे मेंदूला झोपेसाठी आवश्यक असलेले मेलाटोनिन तयार व्हायला मदत होते.

खोली शांत ठेवा किंवा खोलीत अंधार करा

झोपायला योग्य वातावरण असले की झोप आपोआप लागते, त्यामुळे झोपण्यापूर्वी तसे वातावरण तयार करा.

झोपेत व्यत्यय आणणारे पदार्थ टाळावेत

झोपण्यापूर्वी कॅफीन, निकोटीन, आणि जड अन्न टाळा.

व्यायाम करा

दिवसा करा, पण रात्री झोपण्याच्या अगदी आधी नाही.

सकाळचे कोवळे ऊन घ्या

सकाळी उन्हात थोडा वेळ घालवा, यामुळे सर्केडियन रिदम सुरळीत होतो.

परंतु तुम्हाला जर झोप येत नसेल, तर झोपण्याचा अट्टहास करू नका. एखादे मन शांत करणारे काम करा. रोजच्या दैनंदिनीत सातत्य ठेवले, तर शरीर हळूहळू लवकर झोपण्याची सवय लावून घेईल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.