- जयेंद्र लोंढे, jayendra.londhe@esakal.com
गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘मैदान’ या हिंदी चित्रपटात भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ दाखवण्यात आला. १९५२ ते १९६२ यादरम्यान भारतीय फुटबॉल संघाची आशियाई करंडक, आशियाई क्रीडा स्पर्धा तसेच ऑलिंपिक या प्रतिष्ठेच्या स्पर्धांमधील कामगिरी संस्मरणीय व ऐतिहासिक ठरली होती.
त्यानंतर मात्र आजपर्यंत भारतीय फुटबॉल संघाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवता आलेला नाही. याच पार्श्वभूमीवर भारताचे माजी महान फुटबॉलपटू बायचुंग भुतिया यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी भारतातील फुटबॉलला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याची गरज असून सरकार, कॉर्पोरेट यांनीही पुढाकार घ्यायला हवा, असे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.
आताच्या घडीला भारतीय फुटबॉलच्या परिस्थितीबाबत काय सांगाल?
बायचुंग भुतिया : सध्या भारतीय फुटबॉल संघ फिफा क्रमवारीत १२७व्या स्थानावर आहे. त्यामुळे भारतीय फुटबॉलसाठी ही आव्हानात्मक परिस्थिती आहे. यापेक्षा वाईट परिस्थितीमध्ये आपण आता जाऊ शकत नाही; पण पायाभूत सुविधांवर अधिकाधिक लक्ष दिल्यास भारतीय फुटबॉलला प्रगती करता येणार आहे. तसेच दीर्घकालीन विकासाची योजना राबवल्यास भारतीय फुटबॉलची परिस्थिती नक्कीच सुधारेल.
भारतीय फुटबॉलला प्रगतीच्या दिशेने न्यायचे असेल, तर काय करावे लागणार?
मी सुरुवातीपासून सांगतो आहे, की फुटबॉलमध्ये दीर्घकालीन विकासाची योजना अमलात आणायला हवी. अव्वल दर्जाचे खेळाडू निर्माण करायला हवेत. त्यानंतरच भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर मनाजोगते निकाल मिळू शकणार आहेत. तळागाळातील सुविधांवर लक्ष देण्याची गरज आहे. वेळ, पैसा, स्पर्धा या सर्व बाबी या वेळी महत्त्वाच्या ठरणार आहेत. संघटित कामकाजात आपण मागे पडत आहोत.
सुनील छेत्री याने निवृत्तीनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा पुनरागमन केले. हा निर्णय योग्य होता का?
सुनील छेत्री हा भारताचा महान फुटबॉलपटू होय. त्याने काही महिन्यांआधी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीचा निर्णय घेतला; पण भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक मनोलो मारकेझ यांच्या विनंतीमुळे त्याने निवृत्ती मागे घेत भारतीय संघात पुनरागमन केले. हा निर्णय नकारार्थी वाटतो. सुनील छेत्रीचे वय सध्या ४० आहे. तो आणखी किती काळ खेळू शकणार आहे. भारताकडे योग्य पर्याय नसल्यामुळे त्याला पुन्हा बोलवावे लागले. भारतीय प्रशिक्षकांनी युवा खेळाडू तयार करायला हवेत. जेणेकरून भविष्यात भारतीय फुटबॉल संघाला कोणतीही अडचण येणार नाही.
भारतीय फुटबॉलच्या भविष्याबाबत तुम्ही काय सांगाल?
- मी स्वत: १९९२पासून २३ वर्षांखालील भारतीय संघात खेळत आहे. २०११पर्यंत मी भारतीय संघासाठी खेळलो. भारतीय संघामधून खेळताना जीवाचे रान केले. भारतीय संघाला पुढे नेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. भारतीय संघामधून निवृत्त झाल्यानंतर मी मिळवलेला अनुभव युवकांना देण्याचा निर्णय घेतला. आता अकादमीमधून युवा खेळाडू घडवण्याचे काम करीत आहे. या अकादमीमधील काही खेळाडू भारतीय संघामधूनही खेळत आहे. भारतीय फुटबॉलला मी माझ्या पद्धतीने योगदान देण्याचा प्रयत्न करीत आहे; पण भारतीय फुटबॉलच्या प्रगतीसाठी काही सल्ला द्यायचा असल्यास किंवा सूचना करावयाची असल्यास माझा नेहमीच पुढाकार असणार आहे. माझे पहिले प्राधान्य भारतीय फुटबॉलच्या प्रगतीलाच असेल.
भारतामध्ये फुटबॉलसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत का?
- भारतामध्ये फुटबॉलसाठी पुरेशा सोयी-सुविधा नाहीत असे म्हणणार नाही; पण काही आव्हाने आहेत असे मी सांगेन. मैदानांची अवस्था तितकीशी चांगली नाही. खेळाडूंना तिथे जाऊन खेळवण्याचे आव्हान याप्रसंगी आहे. त्यामुळे यावर अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे.
भारतातील सरकार व कॉर्पोरेट यांनी फुटबॉलच्या प्रगतीसाठी पुढाकार घ्यायला हवा का... तुम्हाला काय वाटते?
- नक्कीच. सरकार व कॉर्पोरेट या दोन्हींकडून फुटबॉलच्या प्रगतीसाठी पावले उचलायला हवीत. भारतामध्ये विविध क्लब्स व अकादमी आहेत. यामध्ये खेळाडू तयार करण्याकडे लक्ष देण्यात येत आहे; पण आर्थिक बाबीही महत्त्वाच्या ठरतात. कॉर्पोरेटकडून स्वत:हून पुढाकार घ्यायला हवा. त्यांनी क्लब्स व अकादमींना सहकार्य करायला हवे. त्यानंतर भारतातील फुटबॉल रुळावर येऊ शकते.
भारतीय फुटबॉल संघ १९५२ ते १९६२ यादरम्यान अव्वल दर्जाचा खेळ करीत होता. त्यानंतर मात्र पिछेहाट झाली. त्याबद्दल तुमचे मत?
- भारतीय फुटबॉल संघ १९५२ ते १९६२ दरम्यान अग्रेसर होता. हे मला मान्य आहे. कुणीही नाकारू शकत नाही; पण यानंतर युरोप, दक्षिण अमेरिका या खंडातील देशांनी फुटबॉलमध्ये मोठी झेप घेतली. भारत मात्र पुढे जाऊ शकला नाही. जगातील इतर देशांनी विकास कार्यक्रम राबवले. स्पर्धांचा दर्जा वाढवला. त्यांनी फुटबॉलचा स्तर पुढे नेऊन ठेवला. आपण अपयशी ठरलो. संघटनेतील विवाद, वारंवार बदलण्यात येत असलेले प्रशिक्षक या बाबीही मारक ठरत आहेत. तरीही निराशेला मागे टाकत भारताने कात टाकायला हवी. नव्याने सुरुवात करायला हवी. या खेळामध्ये आपला देश नवी उंची गाठू शकेल असे मला वाटते.
गेल्या काही काळात अखिल भारतीय फुटबॉल संघटनेकडून योजना राबवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यानुसार परदेशातील भारतीय वंशाच्या खेळाडूंना भारतीय फुटबॉल संघातून खेळण्याची परवानगी देण्याचा विचार सुरू आहे. अर्थात यामध्येही अडचणी आहेत. प्रत्यक्षात अजून याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. ही योजना अमलात आणल्यास याचा भारताला कितपत फायदा होईल, हे आगामी काळात कळेलच.