कच्चे तेल चार वर्षांच्या नीचांकी पातळीवर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती चार वर्षांच्या नीचांकी पातळीवर (प्रतिबॅरल 65.41 डॉलर्स) आल्या असताना तेल कंपन्यांनी इंधन दरकपातीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. यापूर्वी एप्रिल 2021 मध्ये किंमत प्रतिबॅरल 63.40 डॉलर्स होती. या घसरणीमुळे पेट्रोल आणि डिझेलमधून मिळणारे तेल कंपन्यांचे उत्पन्न उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. रेटिंग एजन्सींनुसार सध्या तेल कंपन्या पेट्रोलवर प्रतिलिटर 12 ते 15 रुपये आणि डिझेलवर प्रतिलिटर 6 ते 12 रुपये नफा कमवत आहेत. मोठा नफा होत असतानाही तेल कंपन्यांनी गेल्या एक वर्षापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केलेल्या नाहीत.