सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १५ : तालुक्यातील सागरगड माची या डोंगरभागात राहणाऱ्या आदिवासी, कातकरी समाजातील रहिवाशांनी नुकत्याच झालेल्या ड्रोन पद्धतीच्या जमीन मोजणीवर नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात पोयनाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबतची माहिती ॲड. अजय उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. दरम्यान, ड्रोन पद्धतीच्या जमीन मोजणीमुळे काही पिढ्यांपासून वास्तव्यास असलेल्या आदिवासी कातकरी बांधवांच्या जमिनी धोक्यात असल्याची भीती व्यक्त होत आहे.
सागरगड माची हा आदिवासी भाग अलिबागपासून काही किलोमीटर अंतरावर आहे. दुर्गम अशा डोंगरभागात तीनशेहून अधिक लोकवस्ती आहे, तर जवळपास सहा ते सात वाड्या आहेत. अनेक वर्षे मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेल्या या भागात परंपरागत आदिवासी कातकरी समाज वास्तव्य करून आहे. सरकारतर्फे त्यांना दळी जमिनी मिळाल्या आहेत. ते क्षेत्र अंदाजे १० हेक्टर असल्याचे समजते. या जमिनीवर आदिवासीबांधव शेती, पशुपालन करून उदरनिर्वाह करतात. काही दिवसांपूर्वी येथे प्रशासनाकडून ड्रोन पद्धतीने जमीन मोजणी केल्याची माहिती आदिवासींनी दिली. या मोजणीबाबत आम्हाला कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती, असे आदिवासींनी सांगितले. ॲड. अजय उपाध्येदेखील या वेळी उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कायदेशीर सल्ला घेऊन संबंधितांविरोधात पोयनाड पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवल्याचे त्यांनी सांगितले.
१३ जणांकडून पोलिसांत तक्रार
सागरगड माची या डोंगरभागात राहणाऱ्या आदिवासी, कातकरी समाजातील जवळपास १३ जणांनी लेखी तक्रार दाखल केली आहे. ही ड्रोन पद्धतीने झालेली मोजणी नेमकी कशासाठी झाली, याबाबत या आदिवासी कातकरी कुटुंबांना काहीच कल्पना नाही. त्यामुळे त्यांना योग्य ते कायदेशीर सहकार्य करणार असल्याचे ॲड. अजय उपाध्ये यांनी सांगितले.