सीमारेषा
esakal April 13, 2025 11:45 AM

- डॉ. सदानंद देशमुख, saptrang@esakal.com

१९७२ च्या दुष्काळानंतर कृषी क्षेत्रात एक महत्त्वाचा बदल घडून आला. पारंपरिक पीकपद्धतीत अन्नधान्याच्या उत्पादनाला मर्यादा होत्या. वाढत्या लोकसंख्येची भूक भागवण्यासाठी हे उत्पादन अपुरे होते. अधिक उत्पादन व्हावे या दृष्टिकोनातूनच भारतीय कृषीसंस्कृतीत ‘हाराकी’चा प्रवेश झाला.

हायब्रीड (वाण) बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके या माध्यमातून शेतमालाची एकरी झडती वाढवण्यात यश आले. उदाहरणार्थ पूर्वी एकरी पाच पोते गावरान ज्वारी व्हायची. तिथे आता एकरी २०-२५ क्विंटल ज्वारीचे उत्पन्न देणाऱ्या एच. फोर एच. नाइन अशा हायब्रीड ज्वारीची पेरणी होऊ लागली. गहू, कपाशी, तूर, बाजरी अशी सर्वच संकरित वाणं आली.

त्यासाठी बियाणे उत्पादक कंपन्यांकडून शेतकऱ्यांना पायाभूत बियाण्याची निर्मिती करण्यासाठी शेताच्या विशिष्ट तुकड्यावर ‘सीड प्लॉट’ दिले जाऊ लागले. चार तासे मादीचे, तर दोन तासे नराची अशी ही पेरणीची पद्धत होती.

मादी वाणाच्या तासातील कणसे वेगळी काढून त्यातील बियाण्याचे ग्रेडिंग करून पेरणीच्या वेळी सीड कंपन्यांच्या सीलबंद थैल्यातून हे संकरित बियाणे शेतकऱ्यांना विकले जाऊ लागले. त्यातून पुढे उत्पन्नात वाढ झाली. अन्नधान्याचे उत्पादन अशा पद्धतीने वाढले आणि गावरान म्हणून ओळखले जाणारे देशी वाणाचे बियाणे मागे पडले.

संकरित वाणाचा कृषी क्षेत्रातील हा प्रवेश गावगाड्यातील बदलाला पर्यायाने आधुनिकीकरणाला कारणीभूत ठरला. नव्या पीक पद्धतीमुळे शेती-वाडीतील श्रमपद्धतीतसुद्धा बदल झाला. याच काळामध्ये खेड्या-पाड्यातून कपाशीचे जे ‘सीड प्लॉट’ एकरा-दोन एकराच्या क्षेत्रात लावले जात होते तिथे कपाशीच्या फुलांचे नर-मादी वाणाचे क्रॉसिंग मानवी हस्तक्षेपातून केले जात होते.

त्यासाठी आदल्या दिवशी दुपारपासून संध्याकाळ-रात्रीपर्यंत मादी कपाशीच्या फांद्यावर आलेल्या पात्यावरच्या कळ्या खुडून तेथे पांढऱ्या दोऱ्यांची ‘वळखण’ ठेवली जायची आणि सकाळीच त्या जागेवर नर जातीची कपाशीची फुले घासून संकर म्हणजे क्रॉसिंग घडवून आणले जायचे.

असा संकरित कापूस पुढे हंगामात वटवून बीज उत्पादक कंपन्यांकडून चांगला दर देऊन विकत घेतला जायचा. त्याचे ग्रेडिंग करून सीलबंद पिशव्यांत कंपनीचा शिक्का देऊन हे बियाणे शेतकऱ्यांना विकले जायचे. त्यातून एकरी भरपूर झडती मिळायची. उत्पन्नात वाढ व्हायची.

बाकी इतर पिकांच्या क्रॉसिंग प्लॉटचा फारसा फरक पडायचा नाही. कारण एकदा पेरणी झाली, की पुढे त्याचे फारसे सोपस्कार नसायचे; पण कपाशीच्या सीड प्लॉटमध्ये मात्र रोजचा सकाळ-संध्याकाळचा हस्तक्षेप आवश्यकच असायचा. त्यामुळे मोठे मनुष्यबळ लागायचे.

कपाशीच्या सीड प्लॉटमधील हे कळ्या खुडण्याचे आणि सकाळी फुले घासण्याचे काम करण्यासाठी जो मजूरवर्ग लागायचा त्यात स्त्री-पुरुषांचा जसा समावेश असायचा तसाच मुला-मुलींचासुद्धा असायचा. अशा या नव्या कामात मजुरांना रोजच्या मजुरीचे दरसुद्धा वाढवून दिले जायचे.

त्यामुळे अनेक गरजवंत शेतकरी आणि शेतमजूर आपल्या १२-१५ वर्षांच्या मुला-मुलींनासुद्धा पाठवायचे. अर्थातच, त्यामुळे या मुलांना अवेळीच शाळा सोडावी लागायची. पर्यायाने शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची संख्या घटायची. विद्यार्थिसंख्येला गळती लागायची.

असाही एक सामाजिक, शैक्षणिक म्हणता येईल असा परिणाम गावगाड्यात घडून यायचा. मात्र, मुले-मुली कमाई करून आणतात, त्यामुळे त्यांचा आर्थिक सहभाग कुटुंबात वाढायचा आणि गरजवंत कुटुंबाला आधार व्हायचा. त्या काळात मुला-मुलींची पर्यायाने कुटुंबातील सभासदांची संख्याही जास्त असायची.

घरातील खाणारी तोंडे वाढली म्हटल्यावर कमावते हातसुद्धा वाढावेत असे त्यामागचे साधेसुधे धोरण असायचे. ‘घरात नवा जीव जन्माले येते... पण त्यो काही नुस्तंच खाणारं तोंड घेऊन येत नाही तर राबणारे हात-पाय बी घेऊन येते. त्याच्यानं घरातल्यांची संख्या वाढली तरी त्याचं लय उणं-हिवसं मानायचं नसते...’ असे संवाद बायका-माणसांत होताना दिसायचे.

आधुनिक शेती वाढली. त्यातून उत्पन्न वाढले; पण उत्पादनखर्चही वाढला. शेतकऱ्याचे हंगामात उत्पन्न आले, की त्याच्या खर्चाच्यासुद्धा हजार वाटा असतात. त्यामुळे हंगाम संपला, की ‘झाले खळे दळे आणि देणेकरी चुकवले, घास मातेऱ्याचे काही मंग मलेबी उरले’ असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांचा जो ‘शेतीकसे’ वर्ग असतो त्यांच्यावर येते.

साहजिकच पुन्हा पेरणी करायची त्या वेळी बियाण्यांची रासायनिक खतांची, महागड्या कीटकनाशकांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज काढावे लागते, पुन्हा हंगामात फेडावे लागते. हा सर्व प्रकार देशी बियाणे पेरणाऱ्या शेतकऱ्यांच्या आधीच्या पिढीला ‘घर खंदून आंगण भरल्यासारखा वाटतो.’

आरे ‘अशी कशी तुमची ही आधुनिक शेती? हे तर दांडातलं पाणी दांडातच आटून जाते अन् वाफा तसाच कोल्डा फटांग राह्यते’ असे जुन्या पिढीतील शेतकरी म्हणताना दिसायचे. त्यातून घराघरात जुन्या-नव्यांचा मूल्य संघर्ष होताना दिसायचा. त्याचे प्रतिबिंब साहजिकच नव्वदोत्तरी साहित्यात उमटलेले दिसते.

मी या सर्व बदलांचा केवळ साक्षीदारच नव्हतो, तर शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यातील सहभागीदार होतो म्हणून जुन्या-नव्यांचा हा संघर्ष माझ्या ‘तहान’, ‘बारोमास’, ‘चारीमेरा’या कादंबऱ्यांतून आणि कविता-कथांमधून तीव्रोत्कट पातळीवर मला शब्दबद्ध करता आला.

ऐंशीच्या दशकात शेतकऱ्यांची मुले मोठ्या प्रमाणावर शिक्षित झाली. याच काळात शिक्षणसंस्थांना अनुदान मिळत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात शाळा-महाविद्यालये निघाली. शिक्षितांना प्राध्यापक, शिक्षक होता आले. राहणीमान बदलले. शेतकरी-शेतमजुरांची मुले नोकरीत आल्यामुळे बऱ्यापैकी पगार मिळत असल्यामुळे मध्यमवर्गीय जिणे जगू लागले.

हा भर काही काळ म्हणजे साधारणतः दोन दशके कायम राहिला. पुढे नोकरीच्या क्षेत्रातही प्रचंड स्पर्धा वाढली आणि ग्रामीण भागातही सुशिक्षित बेकार मोठ्या प्रमाणात निर्माण झाले.त्यातूनच आजच्या काळात ग्रामीण भागात मोठ्या समस्या निर्माण झालेल्या दिसून येतात.

तरीही एक आशादायी चित्र असे दिसून येते, की हा जो पदवीधर किंवा तत्सम शिक्षण घेतलेला शिक्षित वर्ग ग्रामीण भागात आहे, त्यांना मोठ्या प्रमाणावर निघालेल्या पतसंस्थांनी आणि खासगी शाळांनी आधार दिला. खेड्या-पाड्यातील बरेच शिकलेले तरुण आणि तरुणी आज अशा पतसंस्थांतून आणि खासगी शाळांतून नोकरी करताना दिसून येतात.

कृषी क्षेत्रात जसा नवीन पीकपद्धतीचा अवलंब झाला तसाच ग्रामीण भागातील वाहतुकीच्या साधनांमध्येसुद्धा लक्षवेधी बदल झाला. पूर्वी खेड्यातून मोठ्या प्रमाणावर बैलगाडीचा वापर व्हायचा. लग्नासाठी एका गावातून दुसऱ्या गावी वऱ्हाड जायचे, तेव्हा एका सजवलेल्या दमणीत नवरदेवाची स्वारी असायची, त्याच्यामागे मग दहा-पंधरा बैलगाड्यांतून बाकीचे स्त्री-पुरुष जायचे.

मुलीकडच्यांना मग वऱ्हाडी मंडळींची जशी खाण्यापिण्याची सोय करावी लागे तशीच बैलगाड्यांच्या बैलांच्या चारापाण्याचीसुद्धा व्यवस्था करावी लागे. असा लवाजमा असलेले गाव-खेड्यातील लग्नसमारंभ म्हणजे मोठाच गजबजलेला सोहळा असायचा.

नंतर मात्र खेड्यात सधन शेतकऱ्याच्या घरी ट्रॅक्टर आणि त्यामागे लावलेली ट्रॉली आली. या ट्रॉलीमधून लग्नाचे वऱ्हाड न्यायची पद्धत सुरू झाली आणि बैलगाडीचा तसाच दमणीचा प्रवास मागे पडला.

टायरची चाके अशी रस्त्यावरून धावू लागली. मग जवळच्या गावी पायी जाण्याची किंवा बैलगाडीने जाण्याची पद्धत आपोआपच बंद झाली. सुरुवातीला जीप, नंतर मेटॅडोर, नंतर कालीपिली, नंतर एसटी बस आणि आताच्या काळात शहराप्रमाणेच गावखेड्याच्या रस्त्यावरून ऑटोरिक्षा धावू लागल्या.

दळणवळणाच्या या साधनांमुळे जशी वेळेत बचत झाली तशाच ग्रामीण तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या. संदेशवहनाच्या क्षेत्रात आधी टेलिफोन, मग एस.टी.डी. सेवा आणि आता प्रत्येक हातात आलेला ‘अँड्रॉइड’ मोबाईल. यामुळे तर ग्रामीण भागाच्या समाजजीवनात मोठीच उलथापालथ घडून आली.

पारावर किंवा घराच्या ओट्यावर गप्पा मारून एकमेकांशी संवाद साधणारे सगळे आता खाली मान झुकवून आपापल्या हातातल्या मोबाइलमध्ये गुरफटून गेलेले दिसून येतात. यासह अनेक गोष्टींमधून खेडे आणि शहर यांच्यातल्या सीमारेषा आज धूसर झालेल्या दिसून येतात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.