कोतुर्डे धरणाने गाठला तळ
esakal April 14, 2025 05:45 AM

महाड, ता. १३ (बातमीदार) : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोतुर्डे धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने तसेच एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठाही कमी झाल्याने महाड शहरावर टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. शहरातील बहुसंख्य भागाला आता दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.
महाड शहराला प्रामुख्याने कुर्ले व कोतुर्डे धरणातून पाणीपुरवठा होतो. याशिवाय एमआयडीसी येथूनही काही प्रमाणात पूर्वेकडील व उत्तरेकडील भागांत पाणीपुरवठा होतो. या ठिकाणांहून दररोज ४० दशलक्ष घनमीटर पाणी नगरपालिका शहराला पुरविते.
कोतुर्डे धरणावर २०३१ पर्यंत वाढणारी लोकसंख्या गृहीत धरून शहरासाठी योजना आखण्यात आली, परंतु २०२० पासूनच योजनेतील पाणी शहराला अपुरे पडत आहे. वाढत्या शहरीकरणाचा विचार करता पर्यायी पाणी योजना पालिकेला उभी करावी लागणार आहे. अन्यथा महाड शहराचा पाणीप्रश्न गंभीर होणार आहे.
कोतुर्डे धरणातून थेट जलवाहिनीतून पाणी आणण्यात आले आहे, परंतु धरणातील पाण्यावर रायगड विभागातील सुमारे २१ गावे अवलंबून आहेत. या धरणातील पाणी गांधारी नदीमध्ये सोडून दिले जाते व त्या पाण्यावर या सर्व गावांना पाणीपुरवठा होत असतो. काही दिवसांपूर्वी धरणातील पाणी अशाच प्रकारे सोडून दिल्याने कोतुर्डे धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे महाड नगरपालिकेला आता धरणातील मृत साठ्यातील पाणी पंप लावून उपसा करावे लागत आहे. उपसा केलेले हे पाणी जलवाहिनीतून शहराला पुरवले जात आहे. हा पाणीसाठा कमी झाल्याने आता शहराला एक दिवसाआड पाणी पुरविले जात आहे.
महाड एमआयडीसीकडूनदेखील शहराला होत असलेल्या पाणीपुरवठ्यामध्ये कपात करण्यात आली आहे. एमआयडीसीने पाणीसाठा कमी झाल्याने ही कपात केली आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत हे पाणी पुरावे यासाठी नगरपालिकेने ही उपाययोजना केली आहे. शहरातील काही भागाला कुर्ले धरणातून पाणी मिळते. कुर्ले धरणात सध्या पुरेसा पाणीसाठा असल्याने सध्या काही भागांत पाणीपुरवठा कपात करावी लागलेली नाही.

गृहनिर्माण सोसायटीमधील नागरिकांना भुर्दंड
नळाद्वारे एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने ज्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये विहिरी अथवा विंधन विहिरी नाहीत, त्या सोसायट्यांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. यासाठी काही सोसायट्या खासगी टँकरने पाणी मागवत आहे. यासाठी नागरिकांना भुर्दंड सोसावा लागतो आहे.


पर्यायी उपाययोजना आवश्यक
वाढते शहरीकरण व लोकसंख्या गृहीत धरता नागरिकांची पाण्याची गरज लक्षात घेता, पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे झाले आहे. नव्या धरणांची निर्मिती व जुन्या धरणातील गाळ काढून पाणीसाठा वाढवणे अशा उपाययोजना भविष्यात कराव्या लागणार आहेत. महाड तालुक्यातील कोथेरी धरणाला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळूनही धरणाचे काम कुर्मगतीने सुरू आहे. धरणातील पाणी महाड शहरासाठी राखीव ठेवले जाणार असल्याने हे धरण महाड शहरासाठी उपयुक्त आहे. महाड शहरासह अकरा गावांना कोथेरे धरणाचा फायदा होणार आहे.

महाड शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कोथेरी गावात स्थानिक नदीवर जलसंपदा विभागाकडून मातीचे धरण बांधले जात आहे. या धरणातून एकूण पाणीसाठा ८.८० दश लक्ष घनमीटर असून, परिसरातील जवळपास ५४० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. महाड शहरासह जवळील ११ गावांना याचा फायदा होणार आहे. याशिवाय कोतुर्डे व कुर्ले धरणातील गाळ काढल्यास धरणातील पाणीसाठ्यातही वाढ होऊ शकते. कुर्ले धरणातील गाळ काढण्याचा प्रस्ताव नगरपालिकेने सरकारकडे पाठवला असून, मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

कोतुर्डे धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने मृतसाठ्याचा वापर केला जात आहे. मृतसाठ्यातील पाणी पावसाळ्यापर्यंत पुरावे, याकरिता दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे.
- रोहित भोईर, पाणीपुरवठा अभियंता, महाड नगर परिषद

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.