वाल्मिक कराडचं होणार होतं एन्काऊंटर? प्लॅनही ठरला होता? निलंबित पोलीस अधिकाऱ्याच्या दाव्याने खळबळ!
GH News April 14, 2025 07:10 PM

Walmik Karad News : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड चर्चेच्या केंद्रस्थानी आला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराड हा प्रमुख आरोपी आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगचे अनेक कारनामे समोर आलेले आहेत. दरम्यान, सध्या तो तुरुंगात असताना एका निलंबित पोलीस अधिकाऱ्याने मोठा दावा केला आहे. मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर देण्यात आली होती, असा दावा त्याने केला आहे. त्याच्या या दाव्याने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे.

कासले यांच्या विधानाने एकच खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार वाल्मिक कराडला अटक करण्याच्या चार दिवस अगोदर त्याचे एन्काऊंटर करण्याची मला ऑफर होती, असा दावा निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले यांनी केला आहे. कासले यांच्या या विधानानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे कासले यांच्या या दाव्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कासले हा विक्षिप्त माणूस आहे, असं त्यांनी म्हटलंय.

कासले यांनी नेमका काय दावा केला आहे?

कासले यांचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर मिळाली होती, असा दावा केलाय. या व्हिडीओमध्ये कासले यांनी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावर बोलते होते. “मी आताच रुमवर आलो आहे. मी आताच एक न्यूज पाहिली की अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात 5 पोलिसांवर गुन्हा दाखल करा आणि एसआयटी बसवा असा आदेश देण्यात आला आहे. मला याच एन्काऊंटरबद्दल बोलायचं आहे. एसआयटी बसवून काहीही उपयोग होणार नाही. बोगस एन्काऊंटर कसं केलं जातं, हे मी तुम्हाला सांगतो. मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर देण्यात आली होती. मात्र मी ही ऑफर नाकरली होती. माझ्याकडून एवढं पाप होणार नाही, असं मी सांगितलं होतं. एन्काऊंटर करण्यासाठी तुम्ही बोलाल तेवढी ऑफर देतात. 10 करोड, 20 करोड, 50 करोड अशी तुम्ही बोलाल तेवढी तुम्हाला ऑफर दिली जाते. मी सायबर क्राईम विभागात होतो. मी एन्काऊंटर करू शकतो, हे त्यांना माहिती होतं,” असा दावा कासले यांनी केला.

अंजली दमानिया यांची कासले यांच्यावर टीका

तर दुसरीकडे अंजली दमानिया यांनी कासले यांच्यावर टीका केली आहे. कासले हा माणूस अतिशय विक्षिप्त आहे. त्यांचे आधीचे व्हिडीओ हे अतिशय मद्यधुंद अवस्थेतील आहेत. तुमच्याकडे एवढं शहाणपण होतं, तर तुम्ही अधिकारी असताना तुम्ही ही कारवाई का केली नाही. हा माणूस साबयर विभागात आहे. सायबर विभागातील अधिकाऱ्याला कधीच कुणी एन्काऊंटर करायला सांगत नाही. फक्त प्रसिद्धीसाठी हे केलं जातंय, अशी टीका दमानिया यांनी केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.