विशाखापट्टण : आंध्र प्रदेशातील अनाकापल्ली जिल्ह्यात रविवारी फटाका कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत दोन महिलांसह आठ जणांचा मृत्यू झाला.
आंध्र प्रदेशचे गृहमंत्री व्ही. अनिता यांनी ‘पीटीआय’ला सांगितले की, आगीच्या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला, त्यात दोन महिलांचा समावेश आहे आणि इतर सात जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयांमध्ये दाखल केले जात आहे, आणखी तपशिलाची प्रतीक्षा आहे, असेही त्यांनी सांगितले.
रविवारी दुपारी १२:४५ वाजता ही आग लागली. सध्या अधिकाऱ्यांचे लक्ष मृतदेह काढण्यावर आणि जखमींना रुग्णालयांमध्ये हलवण्यावर आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आणि मंत्री अनिता तसेच अधिकाऱ्यांना जखमींना योग्य वैद्यकीय उपचार मिळवून देण्याच्या सूचना दिल्या.
या घटनेची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. वायएसआसीपीचे प्रमुख वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.