मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘आम्ही बाबासाहेबांचे पाईक’ हा विशेष जनजागृतीपर उपक्रम संपूर्ण राज्यभर राबवण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आज (14 एप्रिल) दिली. या माध्यमातून राज्यातील दलित, मागासवर्ग समाजाला आकर्षित करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा प्रयत्न आहे. (NCP launches campaign saying We are Babasaheb followers)
या उपक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या मानवी हक्क समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांचे महात्म्य जनतेपर्यंत पोहोचवणे. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे महत्त्व अधोरेखित करणे तसेच नव्या पिढीपर्यंत त्यांच्या विचारांचे प्रभावीपणे प्रबोधन करणे हे आहे, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले. तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय संविधानाची उद्देशिका आणि पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी राज्यातील जनतेला उद्देशून लिहिलेले पत्र हे एकत्रित स्वरूपात विविध जिल्हे, शहरे, गाव-खेड्यांतील सर्व प्रमुख ठिकाणी लावण्यात आले आहेत. शाळा, महाविद्यालये, वाचनालये, बुद्धविहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे, स्मारके, बाजारपेठा, महत्त्वाचे चौक, गृहनिर्माण सोसायट्या, सार्वजनिक वर्दळीची ठिकाणे आदी ठिकाणी उद्देशिका आणि पत्र लावले जाईल. संविधान हा केवळ कायद्याचा दस्तऐवज नसून भारताच्या लोकशाही व्यवस्थेचा मूलभूत पाया आहे. त्यामुळे तो सर्वसामान्य जनतेपर्यंत समजेल अशा पद्धतीने हे संदेश पोहोचविण्यात येणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.
हेही वाचा – Politics : खडसेंचे गंभीर आरोप अन् महाजनांनी थेट अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली; काय आहे प्रकरण?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही आम्ही आमच्या पक्षाची नैतिक जबाबदारी मानतो. सद्यस्थितीत समाजातील विविध घटकांमध्ये अदृश्य दरी निर्माण झाल्याचे चित्र आहे. अशावेळी बाबासाहेबांनी दिलेली मानवी हक्क, समता, न्याय आणि बंधुता ही मूल्ये समाजात रुजणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी बाबासाहेबांचे विचार आणि त्यांच्या मूल्यांवर आधारित असलेली भारतीय राज्यघटनेची उद्देशिका जनतेपर्यंत पोचवण्यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतल्याचे तटकरे यांनी सांगितले.
आमचा पक्ष शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपतो. समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या समान संधी उपलब्ध करून देणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख उद्दिष्ट असून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी या महान विचारवंतांची तत्त्वे सदैव मार्गदर्शक ठरतात आणि प्रत्येक नागरिकाने या तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान केवळ संविधानाच्या निर्मितीपुरते मर्यादित नव्हते. त्यांनी भारतीय संसदेमध्ये सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विषमतेविरुद्ध ठाम भूमिका घेतली. पाणी, शेती, मजूर कायदे, महिला हक्क आणि धर्मनिरपेक्षता यांसारख्या क्षेत्रांमध्ये त्यांनी दिलेले विचार आजही शासन आणि समाजासाठी मार्गदर्शक आहेत. त्यांनी बहुजन समाजाच्या उत्थानासाठी आयुष्यभर संघर्ष केला आणि भारतीय लोकशाहीला एक मजबूत चौकट दिली, असेही तटकरे म्हणाले.
हेही वाचा – Politics : अपूर्ण बुद्धीचं पोट्ट; रोहित पवारांच्या टीकेला गुलाबराव पाटलांचे जोरदार प्रत्युत्तर