घर वाचवण्यासाठी सिडको भवनाबाहेर मांडला संसार
esakal April 16, 2025 03:45 AM

वाशी, ता. १५ (वार्ताहर) : उरण तालुक्यातील फणसवाडी येथील आदिवासी वस्तीवर सिडको प्रशासनाकडून होणाऱ्या कारवाईविरोधात स्थानिक आदिवासी बांधवांनी ‘फणसवाडी घर बचाव आंदोलन’ छेडले आहे. वडघर ग्रामपंचायत व आदिवासी फणसवाडी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली सिडको भवना समोर हे आंदोलन करण्यात येत आहे. आदिवांनी आपल्या मुलाबाळांसह सिडको भवनाच्या बाहेर संसार मांडला आहे.
सिडकोच्या कारवाईमुळे फणसवाडीतील १३ कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. या संदर्भात न्याय मिळावा आणि आमच्या हक्काची घरे परत मिळवीत म्हणून या कुटुंबीयांनी सिडको भवनाबाहेर ठाण मांडून आपल्या घरांसाठी लढा सुरू केला आहे. या संदर्भात आंदोलकांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना सादर केलेल्या निवेदनात, संविधानाच्या कलम २१अंतर्गत जीवन व स्वातंत्र्याचा अधिकार डावलून आदिवासींना बेघर करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संविधानिक हक्कांची पायमल्ली होत असतानाही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची संतप्त प्रतिक्रियाही आंदोलकांनी व्यक्त केली आहे.
------------
ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थी रस्त्यावर
९ एप्रिल २०२५ला सिडको प्रशासनाने १३ आदिवासी कुटुंबीयांच्या घरावर तोडक कारवाई केली. त्यामुळे या घरात राहण्याऱ्या शाळकरी मुलांचे मात्र खूप हाल झाले आहेत. ऐन परीक्षेच्या वेळी मुलांना आपली वह्या-पुस्तके घेऊन घराबाहेर पडावे लागले आहे. यामुळे अशा प्रकारची कारवाई म्हणजे आदिवासी मुलांचे भवितव्य अंधारात ढकलण्यासाठी केलेली कारवाई असल्याची भावना आंदोलक व्यक्त करत आहेत.
----------------
हक्कासाठी शेवटपर्यंत लढा
‘घरे आमची, अंगण आमचे, हक्क आमचा. आम्हाला घरातून हाकलून देण्याचा कोणालाही अधिकार नाही. आम्ही आमच्या हक्कासाठी शेवटपर्यंत लढा देणार’ अशा शब्दांत स्थानिकांकडून सिडकोच्या कारवाईविरोधात एल्गार पुकारण्यात आला असून, आम्ही आमच्या हक्काचे घर परत मिळवणारच असा निर्धार आंदोलकांनी केला आहे. फणसवाडीमधील आदिवासी समाज आपली घरे, संस्कृती आणि अस्तित्व वाचवण्यासाठी एकवटला असून, या आंदोलनात महिला, पुरुष आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.