Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray - VIDEO : ''तुमचे शंभर बाप खाली उतरले तरी..'' ; बाळासाहेबांच्या कडक आवाजातून ठाकरे गटाचा भाजपला इशारा!
Sarkarnama April 16, 2025 05:45 AM

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक जिल्हा निर्धार शिबीर उद्या (बुधवार, १६ एप्रिल) सकाळी नऊ ते सायंकाळी साडेसहा या वेळेत नाशिकमध्ये होत आहे. यासाठी पक्षाकडून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कडक आवाजातील एक टिझर आज रिलीज केला गेला आहे. जो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.या टिझरला बाळासाहेबांचा भाषणातील कडक आवाज असून, भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे.

खासदार संजय राऊत यांनी या टिझरचा व्हिडिओ त्यांच्या एक्स हॅण्डलवर पोस्ट केला आहे आणि नाशिक निर्धार शिबीर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब संवाद जय महाराष्ट्र! असं त्यांनी व्हिडओसोबत लिहिलेलं आहे. या व्हिडिओत बाळासाहेब ठाकरे भाषणात बोलतनाची काही क्षणचित्रंही दिसून येत आहेत.

टिझरमध्ये बाळासाहेबांच्या आवाजात नेमकं काय म्हटलंय? -

''जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो... जय महाराष्ट्र...आज तुफान गर्दी दिसतेय. अरे नाशिक म्हटल्यावर गर्दी उसळणारच. नाशिक आणि शिवसेनेचं एक नातं, नाही म्हटलं तरी ते आहे आणि ते राहणारचं.''

तर भाजपवर टीका करताना ''कमळाबाई म्हणजे ढोंग आहे ढोंग. भाजपला महाराष्ट्रात काय, अरे देशात कोणी ओळखत नव्हते. तेव्हा आम्ही त्यांना खांदा दिला. सगळा पैशांचा खेळ आज हिंदुत्वाचे खरे मारेकरी कोणी असतील तर हेच हेच भाजपवाले. हिंदुत्व ही काही तुमची खासगी मालमत्ता नाही. अरे हिंदू हिंदुंमध्ये भांडणं लावली जाताय. जाती, पोटजातीत मारामाऱ्या लावून मजा बघताय.'' असा आरोप करण्यात आला आहे.

याशिवाय ''पण एक गोष्ट ठासून सांगतो, तुमचे शंभर बाप खाली उतरले तरी शिवसेनेचं अस्तित्व तुम्हाला संपवता येणार नाही.'' असा कडक इशाराही बाळासाहेबांच्या आवाजातूनच दिला गेला आहे.

()

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.