यवतमाळ : डाळ सोठवणूकीचे स्टोरेज अंगावर पडल्याने सुपरवायझरसह मजूर बापलेकांचा दबून मृत्यू झाला. ही घटना शहरातील लोहारा एमआयडीसी परिसरात असलेल्या मनोरमा जैन दालमील येथे मंगळवारी (ता १५) रोजी घडली.
भावेश कडवे रा. वर्धा असे मृतक सुपरवायझरचे नाव असून मुकेश सुरेश काजले आणि सुरेश काजले रा. रायपूर खंडवा (मध्यप्रदेश) असे मृतक मजूर बापलेकांची नावे आहे. दिलीप आणि करणसिंग धुर्वे अशी गंभीर जखमी मजूरांची नावे आहे.
या प्रकरणी पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, शहरातील लोहारा एमआयडीसी परिसरात मनोरमा जैन दाल मिल आहे. या दामलीवर अनेक मजूर कार्यरत आहे. मंगळवारी नेहमीप्रमाणे कामकाज सुरू असतांना डाळ साठवणुकीचे स्टोरेज अचानक सुपरवायझर भावेश कडवे आणि मजूर बापलेक सुरेश कडवे, मुकेश कडवे यांच्या अंगावर पडले. त्यामूळे या स्टोरेजखाली दबून तिघांचाही मृत्यू झाला. तर दिलीप आणि करणसिंग धुर्वे हे दोघे मजूर गंभीर जखमी झाले असून त्यांच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात अपर पोलिस अधीक्षक पियूष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश बैसाणे, लोहारा ठाणेदार यशोधरा मुनेश्वर यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर स्टोरेजखाली दबलेल्या मजूरांचे मृतदेह नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. घटनास्थळाचा पंचनामा करून तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. वृत्तलिहीपर्यंत या प्रकरणी लोहारा पोलिस ठाण्यात कुठल्याही प्रकारचा गुन्हा नोंद झालेला नव्हता. याबाबतचा तपास लोहारा पोलिस करीत आहे.