Mumbai News: आता प्रतीक्षा संपणार! वाशी खाडीपूलावरील तिसरा पूल कधी सुरू होणार? मोठी अपडेट आली समोर
esakal April 16, 2025 06:45 AM

नवी मुंबई: वाशी टोलनाका येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाशी खाडीपूलावर ‘एमएसआरडीसी’च्या माध्यमातून नव्याने दोन पूल उभारण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काही महिन्यांपूर्वीच मुंबईहून नवी मुंबईकडे जाणाऱ्या पुलाची एक मार्गिका सुरू करण्यात आली; मात्र नवी मुंबईहून मुंबईकडे जाणारी मार्गिका सुरु नसल्याने वाहनचालकांना कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

आता या पूलाचेही काम पूर्ण झाले असून येत्या दहा दिवसांमध्ये या नव्या मार्गिकेचे लोकार्पण होईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. नवी मुंबई हे शहर मुंबईला जोडण्यासाठी राज्य सरकारने १९७१ला पहिला उड्डाणपूल तयार केला. काळांतराने हा पूल जूना आणि क्षमता कमी होत गेल्याने या पूलाच्या शेजारी १९९५ ला चार मार्गिका असणारा दुसरा उड्डाणपूल एमएसआरडीसीमार्फत तयार करण्यात आला. परंतू या उड्डाणपूलावरील रस्त्याच्या तुलनेत वाहनांची संख्या वाढू लागल्यामुळे वाशी टोलनाक्यावर दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.

मानखुर्द येथे प्रवेशद्वारावर होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सरकारने पुन्हा सुमारे ६०० कोटी रुपयांच्या खर्चाने वाशी खाडीवर तिसरा पूल तयार केला आहे. या पूलावर मुंबईहून नवी मुंबईच्या दिशेला आणि नवी मुंबईहून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी तीन मार्गिका तयार करण्यात आल्या आहेत. या नवीन पूलावरील मुंबईहून नवी मुंबईकडे जाणारी एक मार्गिका काही महिन्यांपूर्वीच खुली करण्यात आली. त्यामुळे मुंबईहून नवी मुंबई, पनवेल आणि पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहन चालकांची वाहतूक कोंडीतून सुटका झाली.

मात्र नवी मुंबईहून मुंबईकडे जाणारी मार्गीका तयार नसल्याने वाहन चालकांना प्रतिक्षा करावी लागली होती. वाशी खाडीपूलावरील नवी मुंबईहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गीकेचेही बांधकाम पूर्ण झाले असून विद्युत यंत्रणा बसवण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. शेवटच्या टप्प्यातील रंगकाम सुरु असून हे काम आठवडाभरात पूर्ण होणार आहे. त्यानंतर लगेचच हा पूल वाहतूकीकरीता खुले होणार असल्याची माहिती ‘एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्याने दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.