PBKS vs KKR: मॅच जिंकवणाऱ्या युजवेंद्र चहलला प्रिती झिंटाने काय-काय दिलं?
GH News April 16, 2025 12:10 PM

आयपीएल 2025 मध्ये 15 एप्रिलच्या रात्री ज्याचा विचारही केला नव्हता, ते पहायला मिळालं. पंजाब किंग्जने कोलकाता नाइट रायडर्स टीमवर विजय मिळवला. पंजाबने अवघ्या 111 धावांचा यशस्वी बचाव करताना आयपीएलमध्ये नव्या विक्रमाचीही नोंद केली. पंजाबच्या या जबरदस्त विजयाचा हिरो लेग-स्पिनर युजवेंद्र चहल ठरला. त्याने हरणाऱ्या सामन्याची बाजी पलटवून पंजाब किंग्जला विजय मिळवून दिला. त्यामुळे या विजयानंतर पंजाब किंग्जची मालकीण प्रिती झिंटाने त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव केला.

पंजाब दिलेल्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात चांगली झाली नाही. सुनील नरेनच्या रुपात संघाला पहिला धक्का बसला. यानंतर लगेचच क्विंटन डिकॉक बाद झाल्याने कोलकाताची अवस्था 2 बाद 7 अशी बिकट झाली. कॅप्टन अजिंक्य रहाणे आणि अंगक्रिश रघुवंशी यांनी कोलकाताचा डाव सावरला. मात्र चहलने रहाणे आणि रघुवंशीला बाद करत कोलकाताच्या अडचणी वाढवल्या. यानंतर वेंकटेश अय्यरही बाद झाल्याने संघ दबावाखाली आला. मग चहलने रिंकू सिंग आणि रमनदीप सिंग यांना सलग चेंडूंवर माघारी धाडत सामना पंजाबच्या बाजूने झुकवला.

प्रिती झिंटाने चहलला काय काय दिलं?

युजवेंद्र चहलला कोलकाता नाइट रायडर्सविरोधातील जबरदस्त कामगिरीबद्दल ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार आणि त्यासोबत दिले जाणारे एक लाख रुपये बक्षिसाची रक्कम चहलला प्रिती झिंटाच्या हस्ते मिळाली. पंजाब किंग्जला सामना जिंकण्यास मदत केल्यानंतर प्रितीने चहलला फक्त एक लाख रुपयांचं बक्षिस दिलं नाही. तर त्यासोबतच त्याला मिठीही मारली.

युजवेंद्र चहल हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत यशस्वी गोलंदाज आहे. एखादा सामना जिंकून देण्याची चहलची क्षमता पाहूनच पंजाब किंग्जची मालकीण प्रिती झिंटाने त्याला आयपीएल 2025 च्या लिलावात 18 कोटी रुपये दिले. विशेष म्हणजे जेव्हा पंजाब किंग्जला सर्वाधिक गरज होती, तेव्हाच चहलने आपल्या दमदार कामगिरीने यश मिळवून दिलं. त्यामुळे प्रिती झिंटा आणि फ्रँचाइजीचा त्याच्यावरील विश्वास आणखी वाढला आहे.

पंजाब किंग्जने गेल्यावर्षी कोलकाताविरुद्ध तब्बल 263 धावांचा यशस्वी पाठलाग करताना विक्रम रचला होता. यंदा पंजाबने अवघ्या 111 धावांचा बचाव करून पुन्हा कोलकाताविरुद्ध आणखी एका विक्रमाची नोंद केली. याआधी सर्वांत कमी धावसंख्येचा बचाव करणाऱ्याचा विक्रम चेन्नई सुपर किंग्जच्या नावे होता. त्यांनी 2009 मध्ये पंजाबविरुद्ध 116 धावांचा बचाव केला होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.