मुंबई : विधानसभा निवडणुकांवेळी शिवसेना शिंदे गट आणि मनसेमध्ये (MNS) मुंबईतील माहिमच्या जागेवरुन वाद झाला होता. राजपुत्र अमित ठाकरे माहिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवार होते, त्यामुळे तिथे महायुतीने उमेदवार देऊ नये अशी अपेक्षा मनसेच्या नेत्यांना होती. मात्र, सदा सरवणकर यांनी येथून शिवसेना पक्षातून निवडणूक लढवली आणि दोघांत तिसरा म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे महेश सावंत विजयी झाले. त्यामुळे, तेव्हापासून राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दुरावा निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, हा दुरावा आता संपुष्टात आला आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदेंनी स्नेहभोजन केले. या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे, त्यातच आता शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी या भेटीवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीवर पहिली प्रतिक्रिया दिली. मी त्या भेटीवर जास्त बोलणार नाही, कारण मी त्यांना जास्त महत्त्व देत नाही, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले. यावेळी, त्यांनी नाव न घेता एकनाथ शिंदेंवरही जोरदार टीका केली. ते एसंशी गटाचे गँगचे लीडर आहेत, आज गावी जाणार आहेत. चंद्र आज कुठल्या दिशेत आहे माहित नाही पण त्यांचं नाराजीनाट्य सुरू झालेल आहे, असे म्हणत एकनाथ शिंदे यांच्यावर आदित्य ठाकरेंनी टीका केली. तसेच, नाराजी नाट्य सुरू झालं की मग गावी जाऊन प्रॅक्टिस करून येतात, असेही आदित्य यांनी म्हटलं.
दरम्यान, राज ठाकरेंच्य भेटीनंतर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिदेंनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. राज यांच्यासमेवत आमची कुठलीही राजकीय चर्चा झाली नसून केवळ सदिच्छा भेट होती. मात्र, आजच्या भेटीत बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा मिळाला, अनेक जुने किस्से ऐकायला मिळाल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. तर, आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने ही भेट होती, त्यानुसार मनसे व शिवसेना एकत्र येऊ शकते, असाही कयास राजकीय विश्लेषक लावत आहेत.
राज ठाकरे यांच्या निंमत्रणावरुन उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी काल राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. याबाबत मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कालच्या भेटीत राजकीय चर्चा नसल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत काम केलं आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे ते म्हणाले. राजकीय चर्चा झाली तर कळेल असंही सामंत म्हणाले.
राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? मंत्री उदय सामंत म्हणाले….
अधिक पाहा..