अभिजीत देशमुख, साम टीव्ही
कल्याणमध्ये दोन गटांत कैऱ्या तोडण्यावरून वाद विकोपाला गेला. एका गटाने कैऱ्या तोडणाऱ्या मुलाच्या वडिलांवर धारदार शस्त्राने हल्ला केलाय. कल्याणच्या महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. कल्याणमधील या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पीडित कुटुंबीयाकडून कारवाईची मागणी होत आहे.
पश्चिमेकडील जोशी बाग परिसरात आज शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. जोशीबाग परिसरातच कैऱ्या तोडण्यास गेलेल्या मुलांचा काही मुलांशी वाद झाला. या वादातून संतापलेल्या एका गटाने भर रस्त्यात एका मुलाच्या वडिलांवर चाकूने हल्ला केला.
रायसिंग खुशवाह असे या जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रायसिंग खुशवाह हे जोशीबाग परिसरात पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करतात. खुशवाह यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ला करणारे आरोपी अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती आहे.
नेमकं काय घडलं?कल्याण पश्चिम जोशीबाग परिसरात राहणारे रायसिंग खुशवाह हे जोशीबाग परिसरात विकण्याचा व्यवसाय करतात. त्यांचा लहान मुलगा आज शुक्रवारी काही मित्रांसोबत जोशीबाग परिसरातच कैऱ्या तोडण्यासाठी गेला होता. यावेळी त्याचा याच परिसरातील काही मुलांशी वाद झाला. या वादामुळे संतापलेला मुलांचा एक गट जोशीबाग परिसरात खुशवाह पाणीपुरी विकत असलेल्या ठिकाणी आला. त्यांनी खुशवाह यांना मुलाबाबत विचारणा केली. त्यानंतर खुशवाह यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
मुलांच्या गटातील एकाने त्याच्या जवळील चाकूने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात खुशवाह जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी तपास सुरू केलाय. हल्ला करणारे आरोपी अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.