Tejashwi Yadav : जागावाटपाबाबत खलबते सुरू; 'आरजेडी'च्या तेजस्वी यादव यांनी घेतली काँग्रेस नेत्यांची भेट
esakal April 16, 2025 05:45 PM

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाच्या सूत्राबाबत राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी)नेते तेजस्वी यादव यांनी मंगळवारी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तसेच राहुल गांधी यांच्याशी खलबते केली.

या वर्षीच्या अखेरीस बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवरही यावेळी चर्चा झाल्याचे समजते. दरम्यान ‘मुख्यमंत्रिपदावर कोणाचा दावा असेल,’ या प्रश्नावर मात्र थेट उत्तर देणे यादव यांनी टाळले.

‘‘बिहारमध्ये सध्या संयुक्त जनता दल(जेडीयू) आणि भाजप यांचे सरकार सत्तेत असून दरडोई उत्पन्न आणि शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या बाबतीत हे राज्य अजूनही खूप मागास आहे. रोजगाराअभावी होत असलेले पलायन हे वास्तव आहे. लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावत असलेल्या प्रश्नांच्या मुद्द्यावरून आम्ही ही निवडणूक लढविणार आहोत.

सरकारच्या त्रुटी जनतेसमोर आणणे, हे आमचे कर्तव्य आहे,’’ असे यादव यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. मुख्यमंत्रिपदाबाबत विचारले असता या विषयावर तुम्ही का चिंता करता ? सत्ता आल्यानंतर घटक पक्षांचे नेते एकत्र येऊन हा विषय मार्गी लावतील. आगामी निवडणुकीनंतर बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार दिसणार नाही, असे यादव म्हणाले.

‘मागच्या एवढ्याच जागा द्या’

गत विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने ७० जागा लढवल्या होत्या. यावेळीही तितक्याच जागा देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. दुसरीकडे अलीकडील काळात निवडणुकांमध्ये झालेली काँग्रेसची सुमार कामगिरी लक्षात घेऊन आरजेडी पूर्वीइतक्या जागा देण्यास तयार नसल्याची चर्चा आहे. दरम्यान यादव यांनी काँग्रेस नेत्यांच्या घेतलेल्या भेटीगाठींवर भाजपने टीका केली आहे. काँग्रेस आणि आरजेडी यांची आघाडी ही शोभणारी नाही. एकमेकांची ताकद कमी करण्याचे काम हे दोन पक्ष करत असतात. काँग्रेसचे जनमत वाढू नये, हाच आरजेडीचा प्रयत्न असेल, अशी टीका बिहार प्रदेश भाजपचे अध्यक्ष दिलीप जैस्वाल यांनी केली.

आणखी दोन फेऱ्या

चर्चेच्या आणखी दोन फेऱ्या पाटणा येथे पार पडणार असल्याची माहिती आरजेडीचे खासदार मनोज झा यांनी दिली. ‘‘निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार निश्चित केला जाणार आहे,’’ असेही त्यांनी सांगितले. दरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी बिहारमध्ये बदल अटळ असल्याची प्रतिक्रिया दिली.

‘‘महाआघाडीला बळ देण्याच्या अनुषंगाने यादव यांच्यासोबत बैठक झाली असून बिहारला मजबूत, सकारात्मक आणि लोककल्याणकारी सरकार देण्याचा आमचा मानस आहे. भाजप आणि इतर संधीसाधू पक्षांपासून बिहारला मुक्त करणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार सत्तेत यावे ही युवक, शेतकरी, कामगार, महिला, मागासवर्गीय, अतिमागासवर्गीय आणि समाजातील इतर घटकांची इच्छा आहे,’’ असेही खर्गे यांनी सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.