आपली चूक कबूल करून दर्ग्याच्या कारवाईचं स्वागत करा,राऊतांच्या गंभीर आरोपावर भाजप आमदाराचा पलटवा
Marathi April 16, 2025 05:37 PM

संजय राऊतवरील देव्हयानी फारंदे: नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील अनधिकृत सातपीर दर्गा हटवण्यात आला आहे. तर मंगळवारी रात्री जमावाकडून काठे गल्ली परिसरात दगडफेक करण्यात आली. यात 31 पोलीस जखमी झाले आहेत. तर पोलिसांनी आतापर्यंत 15 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाकरे गटाच्या शिबिरावरचे लक्ष दुसरीकडे जावे म्हणून दर्ग्यावर बुलडोझर चालवायचा हे कसले लक्षण आहे? हिंमत असेल तर समोर येऊन लढा. पंधरा दिवसांपूर्वीच आजच्या करवाईचा मुहूर्त काढला होता. भारतीय जनता पक्षाच्या लोकांचा याबाबतीत कोणीच हात धरू शकणार नाही, असा हल्लबोल केला. आता संजय राऊत यांच्या टीकेवर भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी जोरदार पलटवार केलाय.

देवयानी फरांदे म्हणाल्या की,  आजची दर्गा काढण्यात आली त्याचे मी स्वागत करते. गेल्या 25 वर्षांपासून स्थानिक नागरिक त्यासाठी लढा देत होते. 2000 साली ही दर्गा रात्रीतून उभी केली होती, त्याचे अनेक पुरावे नागरिकांनी दिले होते. हायकोर्टाच्या आदेशानंतर आज ही दर्गा हटवण्यात आली. मुस्लिम धर्मगुरू आणि पोलीस प्रशासन यांची बैठक झाली आणि त्यानंतर ही दर्गा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. काल मध्यरात्री अचानक काही समाजकंटकांनी दगडफेक केली आणि त्यात काही पोलीस गंभीर जखमी आहेत. पोलिसांवर दगडफेक करणे हे खूप दुर्दैवी आहे, पोलिसांप्रति मी संवेदना व्यक्त करते. हा देश संविधानावर चालतो, झुंडशाहीवर चालणार नाही. ज्यांनी हे दगडफेक केली त्यांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जात आहे. पोलिसांनी त्यांची भूमिका चोख पद्धतीने बजावली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करते, स्थानिक हिंदू नागरिकांनी केलेली मागणी आज त्यांनी पूर्ण केली, असे त्या म्हणाल्या.

त्यांची खरंच बाळासाहेबांची शिवसेना असती तर…

देवयानी फरांदे पुढे म्हणाल्या की, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर हसावे की रडावे हे मला समजत नाही. त्यांना त्यांचा आजचा निर्धार मेळावा महत्त्वाचा वाटत आहे. त्यांची खरंच बाळासाहेबांची शिवसेना असती तर, या कारवाईचे त्यांनी स्वागत केले असते. पोलीस प्रशासनाचे त्यांनी अभिनंदन करायला पाहिजे होते. आज आम्ही शहरात आलो आणि एक अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केलं, असे म्हणाल्या हवे होते. पण ठाकरेंची शिवसेना हिंदुत्वापासून किती दूर गेली आहे, हे यावरून समजत आहे, असा हल्लाबोल त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर केला.

आपली चूक कबूल करून या घटनेचे स्वागत करावे

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना औरंग्याच्या कबरीचे तुष्टीकरण झाले होते आणि त्याच स्वागत त्यांनी केले होते. भारतीय जनता पार्टीने कोणताही मुहूर्त काढलेला नाही. कोर्टाच्या आदेशाप्रमाणे प्रशासनाने त्यांची भूमिका निभावली आहे. उद्धव ठाकरे साहेब आणि संजय राऊत यांना हिंदूंप्रति काही भावना शिल्लक राहिल्या असतील तर आपली चूक कबूल करून त्यांनी या घटनेचे स्वागत करावे, असा पलटवार देवयानी फरांदे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर केला.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Sanjay Raut : नाशिकच्या दर्ग्यावर बुलडोझर फिरवण्यासाठी आजचा दिवसच का निवडला? संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाले…

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.