उन्हाचा वाढतोय तडाखा! वाहनांच्या टायरमधील हवा बघा अन् तीव्र उन्हात प्रत्येक दोन तासाला घ्यावी चालकांनी विश्रांती; अपघात टाळण्यासाठी आरटीओचे आवाहन
esakal April 16, 2025 06:45 AM

सोलापूर : तापमानाचा पारा सध्या ४२ अंशावर गेला असून वाहनचालकांनी भरदुपारी वाहने चालविताना टायरमध्ये योग्य प्रेशरमध्ये (३२ किंवा ३३ प्रेशर) हवा असल्याची खात्री करावी. सलग वाहन चालवू नये, प्रत्येक दोन तासांनी विश्रांती घ्यावी, इंजिनमधील कुलंट देखील तपासावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी केले आहे.

सोमवारी (ता. १४) कुंभारी (वळसंग टोलनाक्याजवळ) परिसरात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची कुर्डुवाडी आगाराची बस जळून खाक झाली. ती बस आठ वर्षांपूर्वीची जुनी होती. अशा जुनाट बसगाड्यांची संख्या परिवहन महामंडळात खूप आहेत. पुणे, मुंबईसह अन्य शहरांमध्ये शेकडो किलोमीटरपर्यंत प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. त्यावेळी या वाहनचालकांनी सलग सहा ते आठ तास वाहन चालवू नये. अपघाताची संख्या व अपघाती मृत्यू वाढू लागले आहेत. तीव्र उन्हामुळे टायर फुटून अपघात होणे, आगीच्या घटना देखील घडतात. त्यामुळे प्रत्येक चालकांनी त्यांच्या वाहनांची (टायर, इंजिन) नियमित तपासणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

भरदुपारी उन्हात वाहन चालविताना खबरदारी घ्यावी

सध्या उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून वाहन चालकांनी भरदुपारी वाहने शक्यतो थांबवून ठेवावीत. दुपारी वाहन चालविताना चालकांनी सलग सहा, आठ तास वाहन चालवू नये. प्रत्येक दोन-दोन तासाला विश्रांती घेतली तर निश्चितपणे अपघात टळतील. वाहनांच्या टायरमधील हवा देखील त्यांनी योग्य प्रेशरमध्ये ठेवावी.

- गजानन नेरपगार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर

जुनाट बसगाड्यांची नियमित हवी तपासणी

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर आगाराकडील सुमारे १०० पेक्षा जास्त बसगाड्या सात-आठ वर्षांपूर्वीच्या जुन्या आहेत. लांबपल्ल्यासाठी अशा गाड्यांना शक्यतो भरदुपारी पाठवू नये. चालकांनी गाडीच्या इंजिन देखील नियमित तपासून घ्यावे. याशिवाय उन्हाच्या तडाख्यात बस चालविताना सलग चार-पाच तास ड्रायव्हिंग नको. त्यांनी दोन-अडीच तासांनी थांबावे, जेणेकरुन किरकोळ बिघाड समजू शकेल आणि अपघात टाळता येईल, असेही आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.