IPL 2025 Punjab Kings vs Kolkata Knight Riders Marathi update : पंजाब किंग्सने इंडियन प्रीमिअर लीगमधील आतापर्यंतच जबरदस्त पुनरागमन केले. पंजाबला १११ धावांचा बचाव करणे जमणार नाही, असे वाटत होते. कोलकाता नाइट रायडर्सला अजिंक्य रहाणे व अंगकृश रघुवंशी यांनी ५५ धावांच्या भागीदारीने सावरले होते. पण, युझवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal) आला अन् सामनाच फिरवला. त्याने चार विकेट्स घेतल्या आणि त्याला अन्य गोलंदाजांनीही मदत केली. संघाने १४ धावांवर सहा विकेट्स गमावल्या. आंद्रे रसेलने एका षटकात १६ धावा चोपून मॅच जवळ आणली होती, परंतु पंजाबने बाजी मारली.
पंजाबचा संघ १५.३ षटकांत १११ धावांवर तंबूत परतला. प्रियांश आर्या ( २२) व प्रभसिमरन सिंग ( ३०) यांनी सुरुवात चांगली केली. पण, हर्षित राणाने पॉवर प्लेमध्ये धक्के दिले. अय्यर खातं न उघडता बाद झाला. त्यानंतर फिरकीपटू वरुण चक्रवर्थी ( २-२१), व सुनील नरीन ( २-१४) यांनी पंजाबची मधळी फळी गुंडाळली. ग्लेन मॅक्सवेल ( ७) आजही अपयशी ठरला. शशांक सिंग ( १८) व झेव्हियर बार्लेट ( ११) हे खेळले म्हणून...
कोलकाताची सुरुवात काही खास झाली नाही. मार्को यान्सेनने पहिल्याच षटकात सुनील नरीनचा ( ५) त्रिफळा उडवला आणि संधी मिळालेल्या झेव्हियर बार्टलेटने दुसरा धक्का दिला. क्विंटन डी कॉक २ धावांवर झेलबाद झाला. अजिंक्य रहाणे व अंगकृश रघुवंशी यांनी KKR चा डाव सावरला. या दोघांची ५५ धावांच्या भागीदारीला युझवेंद्र चहलने ब्रेक लावला. अजिंक्य स्वीप मारण्याच्या प्रयत्नात १७ धावांवर पायचीत केले.
अजिंक्यच्या विकेटनंतर चहलने आणखी धक्के दिले. रघुवंशी २८ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारांसह ३७ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने वेंकटेश अय्यरची ( ७) विकेट मिळवून दिली. त्यानंतर चहलने रिंकू सिंग ( २) व रमणदीप सिंग ( ०) यांच्या विकेट्स घेताना सामन्याला कलाटणीच दिली. पहिल्या ६ षटकांत कोलकाताने ५५ धावांत २ विकेट्स गमावल्या होत्या आणि त्यानंतरच्या पुढील काही षटकांत त्यांनी २४ धावांवर ५ विकेट्स गमावल्या.
आंद्रे रसेल आणि हर्षित राणा यांच्याकडूनच आशा होत्या. पण, श्रेयसने गोलंदाजीसाठी मार्को यान्सेनला परत बोलावले आणि त्याने हर्षितचा ( ३) त्रिफळा उडवून ७९ धावांवर आठवा धक्का दिला. चहलच्या पहिल्या तीन षटकांत ३ विकेट्स आल्या होत्या आणि चौथ्या षटकात आंद्रे रसेलने त्याला झोडला. ४२ चेंडूंत ३३ धावा हव्या असताना चहलच्या त्या षटकात रसेलने १६ धावा चोपल्या. आता कोलकाताला ३६ चेंडूंत १७ धावा हव्या होत्या.
वैभव अरोराने १८ व्या षटकात अर्शदीप सिंगच्या भेदक माऱ्याचा सामना करून पाच चेंडूंवर चांगला बचाव केला. पण, अर्शदीपने शेवटचा चेंडू ओव्हर द विकेट येताना बाऊन्सर वैभवच्या शरीरावर फेकला अन् ग्लोव्ह्जला चेंडू घासून यष्टीरक्षकाकडे विसावला. चेन्नई सुपर किंग्सने २००९ मध्ये ११६ धावांचा यशस्वी बचाव केला होता आणि तो विक्रम मोडला गेला. मार्को यान्सनने १६व्या षटकात रसेलला ( १७) बाद करून पंजाबला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. कोलकाताचा संपूर्ण संघ १५.१ षटकांत ९५ धावांवर तंबूत परतला अन् पंजाबने १६ धावांनी विजय मिळवला.